Talegaon Dabhade: इंद्रायणी नदीवरील आंबी येथील जुना पूल पडला, थोडक्यात अनर्थ टळला

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन, यशवंतनगरमार्गे एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावील इंद्रायणी नदीवरचा आंबी येथील सुमारे 50 वर्षे जुना पूल आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. एमआयडीसीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस गेल्यानंतर पूल कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. 

हा पूल जुना व कमकुवत झाल्याने गेल्या पाच वर्षांपासून तो अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तळेगाव कडून एमआयडीसीत जाण्यासाठी हा सर्वात जुना मार्ग असल्याने बंदीच्या आदेशाला न जुमानता अनेक ट्रकचालक व बसचालक सर्रास या पुलाचा वापर करीत असत. आज सकाळी पहिल्या पाळीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या दहा-बारा बस या पुलावरून गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यानंतर सव्वासहाच्या सुमारास मोठा आवाज होऊन पुलाचा मधला काही भाग कोसळला.

रात्री पूल कोसळला असता व ती बाब कोणाच्या लक्षात आली नसती तर किंवा पहाटे कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस जाताना पूल कोसळला असता तर मोठा अपघात होण्याचा धोका होता, मात्र पुलावर कोणतेही वाहन नसताना पूल कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.

आंबी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भरत घोजगे, आंबी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब घोजगे, पोलीस पाटील भानुदास दरेकर, अशोक घोजगे, जयराम मापारी, दत्तात्रय कानकुडे,माजी उपसरपंच नंदकुमार घोजगे, चंद्रकांत घोजगे आदींनी पूल कोसळल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक थांबवली.

चार पाच वर्षापूर्वी आंबी ग्रामस्थांनी शासनाकडे निवेदन दिले होते. शासनाने पुलाच्या दोन्ही बाजूला बोर्ड लावले होते. जड वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेला होता. तरी जड वाहतुक चालू होती, अशी माहिती अ‍ॅड. मच्छिंद्र घोजगे यांनी दिली.

याच रस्त्यावरील आंबी येथील ओढ्यावरील पूल देखील खचला होता. तो दुरुस्त केल्यानंतर पुन्हा अवजड वाहनांनी या रस्त्याचा वापर सुरू केला होता. आता मुख्य नदीवरील पूल कोसळल्याने कातवी पुलावरून मोठा वळसा मारून तळेगावला जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

कोसळलेल्या पुलाच्या शेजारी नवा जास्त उंचीचा भक्कम पूल बांधून गैरसोय दूर करावी, अशी मागणी आंबी ग्रामस्थांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.