Talegaon Dabhade : शेतकरी हा केंद्रबिंदू मानून पतसंस्थेने जनसेवेचे काम करावे- बाळा भेगडे

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र सहकाराचे आगार आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून जनसेवेचे व्रत घेऊन काम करावे.
नागरी सहकारी पतसंस्थेचे बँकेत रूपांतर व्हावे असा आशावाद कामगार, पुनर्वसन आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी यावेळी व्यक्त केला. तळेगाव दाभाडे येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 21) पार पडली. या सभेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भेगडे बोलत होते.

या सभेचे उद्घाटन सरदार सत्यशीलराजे दाभाडे व संस्थापक खंडुजी टकले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक सुनील शेळके, वडगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष तुकाराम काटे, अमृता टकले, दत्तात्रय शिंदे, शंकर शिंदे, सुदेश गिरमे उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय शेटे होते.

बाळा भेगडे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्र हे सहकाराचे आगार आहे. महाराष्ट्रात सोळा हजार नागरी सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला कर्जपुरवठा केला जातो. बुडीत कर्जामुळे अनेक पतसंस्था डबघाईला आल्या आहेत. या संस्थांना पुनर्जीवन देण्यासाठी शासनाने धनंजय गाडगीळ समिती स्थापित केली आहे. पतसंस्थांनी एका व्यक्तीला पाच लाख रुपये कर्ज देण्यापेक्षा पन्नास लोकांना दहा हजार रुपये कर्ज दिल्यास कर्जदारावर कर्जाचा बोजा पडणार नाही आणि पतसंस्थेला देखील कर्ज वसुली करणे सोपे जाईल अशी सूचना भेगडे यांनी केली. ही पतसंस्था नागरी बँक व्हावी अशी शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली.

या सभेत शिवव्याखाते डॉ. प्रमोद बोराडे यांनी सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्यावर सुंदर व्याख्यान सादर केले. सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना पतसंस्थेच्या अद्यावत कामकाजाबाबत कौतुक केले.

सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये पतसंस्थेकडे 10 कोटी 68 लाखाच्या ठेवी असुन, कर्जवाटप 9 कोटी 57 लाख आहे. तसेच पतसंस्थेची या वर्षी उलाढाल 50 कोटी झाली असुन, पतसंस्थेस रु. 43 लाख 65 हजार नफा झाला आहे. सभासदांना 11% लाभांश जाहीर केला आहे. या सभेत या वर्षात सर्वाधिक दैनिक ठेव रक्कम जमा केल्याबद्दल दैनिक बचत प्रतिनिधी प्रवीण वडनेरे, समाधान शिंदे व बाळासाहेब कडु यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सुत्रसंचालन पतसंस्थेच्या मुख्य व्यवस्थापिका सुनीता शेंडे व अनिल धर्माधिकारी यांनी केले. सचिव विनोद टकले यांनी अहवाल वाचन केले, संचालक संजय शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व खजिनदार शंकरराव शिंदे यांनी आभार मानले. ही सभा यशस्वी करण्याकरिता संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.