Talegaon Dabhade: नगरपरिषदेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने आज (गुरुवारी) गाव ते स्टेशन रस्त्यावरील तसेच स्टेशन चौक, मराठा क्रांती मोर्चा चौक परिसरातील अतिक्रमणांवर कडक पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत दुकाने, हाॅटेल, शेड, ओटे, अनधिकृत टपऱ्या तसेच कच्ची-पक्की अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईत तीन जेसीबी मशीन , पोकलेन, ट्रॅक्टर यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

  • नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता ही यशस्वी कामगिरी केली. मुख्याधिकारी वैभव आवारे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरुवात झाली.

गाव – स्टेशन रस्त्यावरील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेजवळील काका हलवाई स्वीट सेंटर जवळील अनधिकृत टपरी हटवून कारवाईस सुरुवात झाली. टेलिफोन एक्सचेंज समोर असलेले मोठे लोखंडी सांगाडे हटविण्यात आले. या कारवाईच्या वेळी काही व्यावसायिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे काही चालले नाही. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.

  • तळेगाव स्टेशन चौक तसेच मराठा क्रांती मोर्चा चौक आणि परिसरातील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटविण्यात आली. तळेगाव जनरल हॉस्पिटलकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची सीमा भिंत जमीनदोस्त करण्यात आली.

मुख्याधिकारी वैभव आवारे, बीट विभाग प्रमुख संभाजी भेगडे यांच्यासह रवींद्र काळोखे, मयुर मिसाळ,प्रमोद फुले, प्रवीण माने, पद्मनाभन कूल्लुरवार, शरद पाटील, अमित भोसले, विशाल मिंड, प्रशांत गायकवाड,सुनील कदम, विलास वाघमारे आदींचा अतिक्रमण विरोधी पथकात सहभाग होता.

  • तळेगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुदास जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, कुंदा गावडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर यांच्यासह 50 हून अधिक पोलीस अधिकारी- कर्मचारी यांचे पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.