Talegaon Dabhade News: फेरीवाल्यांना आत्मनिर्भर निधी कर्ज योजना त्वरीत मंजूर करा- दिलीप गायकवाड

तळेगाव दाभाडे शहरात 514 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले असून त्यापैकी आजपर्यंत 116 फेरीवाल्यांनी ऑनलाइन अर्ज भरून कर्जाची मागणी केली आहे.

एमपीसी न्यूज- आपत्तीच्या काळात सुरु झालेली केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी कर्ज योजना लोकांना तत्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी बँकांनी सामाजिक जाणीव राखून तत्काळ कर्ज प्रकरणे मंजूर करावीत असे मत तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

तळेगाव दाभाडे शहरात 514 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले असून त्यापैकी आजपर्यंत 116 फेरीवाल्यांनी ऑनलाइन अर्ज भरून कर्जाची मागणी केली आहे.

त्यामधील शहरातील बँकांनी फक्त 21 कर्ज प्रकरणे मंजूर केलेली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कर्ज प्रकरणे बँक ऑफ इंडियाने मंजूर केली असून इतर राष्ट्रीयकृत बँकांनी अद्याप पुरेसा प्रतिसाद दिलेला नाही. अद्यापही 95 कर्ज प्रकरणे बँकाकडे प्रलंबित आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.

केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी – पथविक्रेत्यासाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची तळेगाव दाभाडे शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. कोरोना साथीचा आजार सर्वत्र पसरलेला असल्याने आणि परिणामी टाळेबंदीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झालेला आहे.

बहुतांश पथविक्रेते कमी भांडवलावर व्यवसाय करतात. जे कांही भांडवल त्यांच्याकडे होते ते ही या टाळेबंदीमध्ये शिल्लक राहिले नाही. त्यामुळे पथविक्रेत्याना व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने होणे आवश्यक आहे.

यासाठी शहरातील ज्या फेरीवाल्यांनी अद्याप या केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी कर्ज योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केलेले नाहीत. त्यांनी नगरपरिषदेत आधारकार्ड, मतदानकार्ड, बँकेचे पासबुक घेऊन फोटोसह विहित नमुन्यातील अर्ज करावेत. असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला 7 टक्के व्याजात सूट

केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी कर्ज योजनेतील कर्जदाराने नियमित कर्ज परतफेड केल्यास त्यास 7 टक्के व्याजातील सबसिडी मिळणार असून त्यास दुबार कर्ज देखील मिळेल, असे दिलीप गायकवाड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.