Talegaon Dabhade : दमदार गायकीचे उगवते तारे

112

(सतीश व.वैद्य)

HB_POST_INPOST_R_A

एमपीसी न्यूज- दोन दिवसांपूर्वी एका संस्थेने गायन स्पर्धांमधे परीक्षक म्हणून बोलावले होते. या स्पर्धेमध्ये ८ ते १२ वर्षाच्या वयोगटातील मुलांनी तयारीने म्हटलेली गाणी ऐकून मी चकितच झालो. त्यांची गाणी ऐकून माझी झोप उडाली होती. हा माझा अनुभव सगळ्यांसोबत शेअर करावा म्हणून हा लेखनाचा खटाटोप.

शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत, सुगम संगीत या प्रकारात तीन वयोगटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. सुगम संगीत स्पर्धेत 8 ते 16 वयोगटातील मुलामुलींची स्पर्धा सर्वप्रथम सूरू झाली. मी घरून मारे ठरवून निघालो होतो की 3 -4 मुलांच गाऊन झाल की मधेच थोड थांबवून बोलायची परवानगी घेऊन बोलायचं. कारण आपापली गाणी म्हणून झाली की स्पर्धक आणि त्याच्या बरोबर आलेले पालक थांबत नाहीत. आणि जी मंडळी थांबतात त्यांना या बोलण्यामध्ये अजिबात रस नसतो. त्यामुळे कधी एकदा संपतंय अशा अविर्भावात ते आपलं बोलणं ऐकत असतात.  पण काय सांगू ?  पहिली 4-5 मुलं इतक्या तयारीने गायली की माझी विकेटच काढली त्यांनी !

स्पर्धेमध्ये कसे गावे ?, स्पर्धा कशासाठी असतात ? स्पर्धा का असतात ? स्पर्धेत गातोय अस मनात न आणता गा,परीक्षक तुमचे शत्रू नाहीत वगैरे… वगैरे … मी बोलणार होतो. मुख्य म्हणजे आम्ही कोणत्या निकषावर निकाल देतो, नंबर्स देतो ते या मुलांना सांगणार होतो पण ही मुलं तर भलतीच हुशार निघाली. त्यांच्या गाण्यातून त्यांना ते सगळ आधीच माहीत होत असच मला जाणवलं. गाण्याची निवड, गाण्याचा सूर ताल लय, सादरीकरण आणि परिणाम या चार गोष्टी निकाल देताना पाहिल्या जातात. हेच ते निकष-पॅरामीटर्स-क्रायटेरीया. .यात आणखी काही अॅड करायच असेल तर परीक्षकांना मुभा असते.

1) गाण्याची निवड- आपल्या प्रत्येकाच्या आवाजाचा एक पोत असतो. म्हणजे सोप्या मराठीत त्याला ढाचा व व्हाॅईस क्वालीटी असे म्हणतात. त्यानुसार गाणे निवडले पाहिजे. नाहीतर आपला आवाज मुकेश, सेहगल सारखा व गाण महेंद्र कपूरच वरच्या सूरातल असेल तर आपण फेल ! उगाच कठीण गाण न निवडता सोपेच गाणे निवडा. गाण्याचे शब्द सोपे, जोडाक्षर कमी, गाताना उच्चार करण्यास सोपे असतील हे बघावं.

2) ताल सूर लय- ताल सूर लय या शिवायच गाण म्हणजे नुसता आवाज, गोंगाट,गर्दभराजांच तांडव. बारा सूर पेटीवर दिसतात ना त्यातील एक “सा” ! तो सा धरून निवडलेल गाण त्या सूरात म्हणायचं.तुम्हाला तुमचे गुरू यात मदत करतील. सुगम संगीत चांगल अवगत करण्यासाठी शास्त्रीय पाया तयार करावाच लागतो. शास्त्र बेसिक लेवलच तरी माहीत हवं. ते शिकलात तर ताल व लय काय असत हे ही कळेल. नाहीतर..हॅ.. त्या परीक्षकाला काय कळतय ? मी मस्त गायलो तरी त्यानं नंबर नाही दिला. ओळखीच्यांनाच बक्षीस देतात. वगैरे वगैरे म्हणून स्वतःचे नुकसान होते.

3) सादरीकरण- म्युझिक ही परफाॅर्मिंग आर्ट आहे. तुम्हाला गाण्याच व्याकरण, माहिती आहे, अगदी मास्टर्स, डाॅक्टरेट डीग्री आहे तरीसुद्धा तुम्हाला चांगलं गाता येत नसेल तर त्याचा फारसा उपयोग नाही. सादरीकरण यात तुम्ही दिसता कसे, तुमचे कपडे किती महागडे आहेत. याला काही अर्थ नाही. पण नीटनेटक, ताजतवान (फ्रेश ) दिसावे.

एका मराठी वाहिनीवर सध्या गाण्याच्या स्पर्धा चालू आहेत त्यात प्रत्येक गाण झाल की ते परीक्षक काय मस्त मस्त कमेंटस् करतात. ऐकून बघून भरून येत.चाबूक ! मित्रा तोडलस, टांगा पलटी, वगैरे.आणि त्यात त्या मॅडम…वा ! खूपच छान मराठी ‘स्पिक’ करतात. त्यांचे मराठी ऐकून आमची ‘एंटरटेनमेंट’ होते. दिसतात पण काय……. एकदम चाबूक ! आमची सौ. रोज त्यांची मीठमोहरीनं दृष्ट काढते..अहो करोडो लोक बघतात तो मराठमोळा कार्यक्रम..आम्ही तर बाबा भरून पावतो.

असो. तुमचे गाणे चाल शब्दासहीत तोंडपाठ असल पाहिजे. कवितेतील, गीतातील भाव दिसला पाहिजे. त्या काव्यातून कविला काय सांगायच आहे ते गाण्यातून एक्सप्रेस करता आल पाहिजे. तरच तुम्ही भाव खाऊन जाल. नाहीतर एखाद सॅडसाँग देशभक्तिपर सारख आवेशान म्हटल तर गाण्याची वाट लागायची . सांगायचे म्हणजे गीतातील शब्दांचे उच्चार चुकू नका.

लहान मुलांनी”एका तळ्यात होती”, चाफा बोले ना, अशी आमच्या बालपणातील गाणी सादर केली. ही गाणी आम्ही स्पर्धांमधून गात असू. मला ते माझे दिवस आठवले. 1950 चे दशकातील ती गाणीच अजरामर आहेत. “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख”हे गाणं आम्ही बरीच मुल गायचो. त्यातल्या शेवटच्या ओळी “पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक” इतक्या परिणामकारक ठरल्या की आम्हाला सर्वांनाच वाटायचं की मीच राजहंस !

आम्ही कधी एकमेकाना पाण्यात पाहायला लागलो. कळलेच नाही. तेव्हांपासूनच साठ वर्षापूर्वीपासूनच प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरु झाल्या. त्या नंतर त्या जीवघेण्या कधी झाल्या कळलच नाही. आयुष्यात स्पर्धा हव्यातच पण त्या स्वतःला आजमावण्यासाठी. जगात आपण पुढच्या प्रवासासाठी कुठपर्यंत तयार आहोत हे स्पर्धांमुळे समजू शकेल. निखळ आनंदासाठी भाग घ्या. पण जिंकलो तर हात स्वर्गाला लागले किंवा हरलो तर सगळ संपल अस कधी मानू नका. प्रत्येक स्पर्धेत मीच पहिला येणार असा अट्टहास नको. स्वतःला सिद्ध करून दाखवा त्यासाठी स्पर्धा कशाला ? आपल्या स्वतःच्या आनंदासाठी गात रहा. विविध स्पर्धांमधे भाग घ्या. पण त्यात जिंकल्याचा गर्व नको व हरल्याचा न्यून नको. म्हणूनच कदाचित बोलताना आपण “one of the best….”असा शब्दप्रयोग करतो. खर म्हणजे superlative can be one and only.

तुम्हाला समजले असेल मला काय म्हणायच आहे ते ! त्यावेळेस आमच्या घरातले आईवडील,आजी आजोबांनी कधी” तू हरलास कसा? तुला पहिला नंबर का नाही”म्हणून शिक्षा नाही केली किंवा परीक्षकांशी वाद नाही घातला. जिंकलेल्या मुलांच कौतुक मनापासून केलं. आई वडिलांनी व आम्ही हरल्याबद्दल कधी स्वतःला अपमानित झाल्यासारख वाटून घेतल नाही. आयुष्यात स्पर्धा नकोत अस आपण म्हणू शकत नाही. असो.

या स्पर्धेमध्ये युवा गटातील मुलींनी बाजी मारली. एकदम मॅच्यूअर गाण.! “मी मज हरपून”,’तरूण आहे रात्र अजूनी’,’ऋतू हिरवा’,’आज कुणीतरी यावे” सारखी गाणी खूप समर्थपणे सादर केली. एकंदरीत परीक्षक म्हणून स्पर्धकांनी माझीच परीक्षा घेतली. त्यांचे गाणे ऐकून मला खूप आनंद झाला. मी स्पर्धा खूप एन्जाॅय केली. सर्व संबंधीतांचे आभार ! धन्यवाद !

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: