Talegaon Dabhade: बडोदा बँकेच्या एटीएम सेंटरला आग

Talegaon Dabhade: Bank of Baroda ATM room on fire

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथे चाकण रस्त्यालगत असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएम आज (शनिवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आगीत जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती. थोड्याच वेळात आग आटोक्यात आली. आगीत नेमके किती नुकसान झाले याबाबत माहिती मिळू शकली नाही.

तळेगाव-चाकण रस्त्यावरील सारस प्लाझा इमारतीमध्ये बँक ऑफ बडोदाची शाखा व एटीएम सेंटर आहे. नगरसेवक गणेश खांडगे, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे व सतीश ओसवाल यांनी आगीच्या घटनेची माहिती नगर परिषदेच्या अग्निशमन दलास तसेच पोलिसांना कळविली. महावितरणचे कर्मचारी सतीश तुसे व नरेंद्र भुईंगळ यांनी प्रसंगावधान राखून इमारतीच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलातील ताहीर मोमीन, शेखर खोमणे, रोहित पवार, बाबू ठाकर यांनी थोड्यात वेळात आग विझविण्यात यश मिळविले. त्यामुळे एटीएम सेंटर शेजारी असलेल्या बँकेच्या शाखेला तसेच इमारतीमधील अन्य दुकाने, कार्यालये आणि सदनिकांपर्यंत आग पसरू नये म्हणून काळजी घेण्यात आली. इमारतीतील काही सदनिकांच्या खिडक्यांच्या काचा आगीची झळ लागून फुटल्या.

पोलीस निरीक्षक नीलेश डोईफोडे तसेच पोलीस कर्मचारी दिगंबर अटिगरे, उमेश पुजारी, बाबाराज मुंडे, आकाश ओव्हाळ यांनी बघ्यांची गर्दी नियंत्रित केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले, एटीएमचे इंजिनिअर येईपर्यंत एटीएम मशीनमध्ये किती रक्कम होती, हे कळणार नाही. ते आल्यानंतरच कळेल, मात्र मशीन व इतर साहित्य धरून तीन लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. असे वाघमोडे यांनी सांगितले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी पुढील तपास करीत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.