Talegaon Dabhade : जबरी चोरी करून कॅब चालकाचा गोळ्या घालून खून करणाऱ्या दोघांना अटक

दोन कट्टे आणि 31 काडतुसे जप्त ; तळेगाव एमआयडीसी आणि तळेगाव पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – जबरी चोरी करून ओला कॅब चालकाचा गोळ्या घालून निर्घृण खून केला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी दोघांना नागपूर मधून अटक केली. अटक केलेल्या दोघांकडून दोन गावठी कट्टे, 31 जिवंत काडतुसे आणि एक चाकू जप्त केली आहेत.

वैभव उर्फ पिंटू धनराज बीजेवार (वय 33, रा. हनुमान गल्ली, नागपूर), दिगंबर उर्फ अक्षय मधुकर मेश्राम (वय 25, रा. मोर्शी अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ज्ञानेश्वर किसन वरबडे असे खून झालेली ओला कॅब चालकाचे नाव आहे.

ज्ञानेश्वर ओला कॅब चालविण्याचे काम करत होता. 20 मे रोजी वैभव आणि दिगंबर यांनी ज्ञानेश्वर याची कॅब ताथवडे मधून बुक केली. बराच वेळ दोघांनी कॅब फिरवली. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी गावाच्या हद्दीत आल्यानंतर दोघांनी ज्ञानेश्वरच्या पोटात दोन गोळ्या घालून खून केला. आरोपींनी ज्ञानेश्वरचे एटीएम कार्ड आणि कार घेऊन पोबारा केला. तळेगाव एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला पोलिसांना ज्ञानेश्वरची ओळख पटली नाही.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस संयुक्तरित्या करीत होते. तांत्रिक आणि अन्य मुद्द्यांचा तपास घेत पोलिसांनी ज्ञानेश्वरची ओळख पटवली. तो ओला कॅब चालविण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना त्याची ओला कॅब खेड तालुक्यातील सावदरी येथे मिळाली. कॅबमधील बुकिंग टॅबलेटच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

वैभव आणि दिगंबर हे खून केल्यानंतर दिल्ली आणि त्यानंतर नागपूर येथे गेल्याचे पोलिसांना तांत्रिक तपासात आढळले. दरम्यान त्यांनी ज्ञानेश्वर याच्या एटीएम मधून 13 हजार 500 रुपये काढून घेतले. गुन्हे शाखा युनिट दोन आणि तळेगाव एमआयडीसी पोलिसांचे संयुक्त पथक नागपूरला तात्काळ रवाना झाले. पोलिसांनी दोघांना नागपूर मधून ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे, 31 जिवंत काडतुसे व एक लोखंडी चाकू जप्त केला. जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने हा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, साधना पाटील, पोलीस कर्मचारी मयूर वाडकर, प्रशांत सोरटे, सुधीर वाडीले, नितीन तारडे, नितीन बहिरट, लक्ष्मण आढारी, महादेव जावळे, एकनाथ कोकणे, फारूक मुल्ला, प्रवीण दळे, नारायण जाधव, संदीप ठाकरे, संजय गवारे, हजरत पठाण, सतीश कुदळे, तुषार शेटे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.