एमपीसी न्यूज – माहेरहून लाखो रुपये आणण्याची पत्नीकडे मागणी केली तसेच मुलगी झाली म्हणून तिचा छळ केला, अशी फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल राजेंद्र मांजरेकर (वय. 30) असे गुन्हा दाखल झालेल्या मनसेच्या शहर अध्यक्षाचे नाव आहे. त्यांच्यासह रंजना राजेंद्र मांजरेकर, राजेंद्र लक्ष्मण मांजरेकर, प्राची अमर माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राहुल यांच्या पत्नी सीमा राहुल मांजरेकर (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 7 डिसेंबर 2014 ते 18 जुलै 2020 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली. गाडी घेण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्यांनी सीमा यांच्याकडे केली.

सासरच्यांना मुलगा हवा होता, मात्र सीमा यांना मुलगी झाली. या कारणावरून सासरच्या मंडळींनी सीमा यांचा छळ केला.तसेच आरोपी पती राहुलचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून देखील आरोपी यांनी सीमा यांचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे सीमा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

यासंदर्भात सीमा प्रथम पोलीस ठाण्यात गेल्या असतानाही त्यांच्याकडून केवळ तक्रार अर्ज लिहून घेण्यात आला, मात्र पती राहुल यांची फिर्याद दाखल करून घेण्यात आली. या प्रकरणी विमेन हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्याकडे तक्रार व पाठपुरावा केल्यानंतर अखेर सीमा यांची तक्रार दाखल करून पती राहुल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पती राहुल मांजरेकर यांनी देखील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सीमा राहुल मांजरेकर, कमल गजानन खांडेभराड, कविता अनिल सातकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीमा यांची आई आणि बहीण यांनी घरी येवून फिर्यादी राहुल यांना लोखंडी गज व लाथाबुक्यांनी गंभीर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे राहुल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.