Talegaon Dabhade : तळेगावकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा – संग्राम काकडे

एमपीसी न्यूज- पवना धरणातील पाणीसाठ्यात कडक उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तसेच लांबणीवर गेलेल्या मान्सूनमुळे तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे व पाण्याची नासाडी करू नये असे आवाहन नगरपरिषदेचे पाणीपुरवठा समितीचे सभापती, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी केले.

तळेगाव शहराला पवना आणि इंद्रायणीनदीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यातून दररोज सुमारे 2 कोटी 10 लाख लिटर पाणी वापरण्यात येते. पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस उन्हामुळे कमी होत आहे. पवना धरणातील पाणीसाठा अवघा 20 टक्के इतका शिल्लक राहिला असून मान्सून लांबणीवर पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

शहरातील काही नागरिक पाण्याचा वाजवीपेक्षा आधिक वापर करत असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी नळाला तोट्या नाहीत, घर व अंगणामध्ये सदा घालणे, दुचाकी चारचाकी गाड्या धुण्यासाठी पाण्याचा वापर करणे तसेच काही नागरिक बांधकामासाठी पाण्याचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
भविष्य काळासाठी उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेता नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळावी आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन नगरपरिषदेचे पाणी पुरवठा समितीचे सभापती संग्राम काकडे यांनी केले आहे.

तळेगाव शहरात इंद्रायणी पाणी पुरवठा योजनेतून ९ एमएलडी आणि पवनेतून 13 एमएलडी लिटर पाणी रोज घेतले जात असून शहरातील १ लाख नागरिकांसाठी याचा वापर केला जातो. शहरासाठी पाणी साठविण्यासाठी एकूण दहा साठवण टाक्या लाखो लिटर क्षमतेच्या आहेत त्याव्दारे शहराला पाणी पुरवठा होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.