Talegaon Dabhade: शहरात गुरुवारपासून तीन दिवसांचा ‘जनता लॉकडाऊन’

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि शहर समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १६, १७ व १८ एप्रिल रोजी सलग तीन दिवस ‘जनता लॉकडाऊन’चे आवाहन करण्यात आले आहे. 

या काळात फक्त दवाखाने, औषध दुकाने व सकाळी दुध विक्री या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाव्दारे जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच तळेगाव शहरात नगरपरिषदेने शासनच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले आहे. यासाठी वेळेला अतिशय कठोर भूमिका घेतल्याने कोरोना विषाणूपासून वाचण्याची मोठी जागृती शहरात निर्माण झाली आहे.

यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. प्रवीण कानडे, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी आपल्या  पातळीवर चांगले नियोजन केले आहे. तर शहरातील काही समाजसेवी संस्था, सामाजिक संस्था, नगरसेवक व दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात यासाठी पुढाकार घेऊन मदत केली आहे.

किराणा, भाजीपाला विक्रीच्या वेळा

तळेगाव दाभाडे शहर परिसरातील किराणा दुकाने, भाजीपाला व्यावसायिकांच्या विक्रीच्या वेळा तळेगाव दाभाडे नगर परिषद, शहर समन्वय समिती, किराणा असोशिएशन आणि भाजीपाला व्यापारी संघाने संयुक्तपणे  ठरविल्या आहेत.  त्याप्रमाणेच  विक्रीचे व्यवहार करावेत, असे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे.

यामध्ये शहरातील किराणा दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत, भाजीपाला विक्री दुपारी दोन ते संध्याकाळी सहापर्यंत सुरू राहील. कोणताही व्यापारी तसेच भाजीपाला व्यावसायिकाने  कोणताही माल वाजवी दरापेक्षा महाग विकू नये. तसे निदर्शनास आल्यास तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.