Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे कडकडीत बंद, चाकण रस्त्यावर ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला तळेगाव दाभाडे व परिसरातील गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तळेगाव स्टेशन येथे चाकण रस्त्यावर सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, नवलाख उंब्रे, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, माळवाडी, इंदोरी आदी गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा, महाविद्यालये, दुकाने, बँका, बस व रिक्षा वाहतूक बंद आहे. बंदसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणत्jयाही अनुचित घटनेचे वृत्त नाही.

सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने सकाळी साडेदहाच्या सुमारास सिंडिकेट बँकेजवळील चौकात जमा झाले व तेथून मोर्चाने आमदार बाळा भेगडे यांच्या जनसंपर्क कार्यालयापर्यंत मोर्चाने आले व त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करीत तळेगाव-चाकण रस्ता रोखून धरला. आमदार भेगडे हे देखील त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले. मराठा समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

सिंडिकेट बँकेजवळील चौकाचे मराठा क्रांती चौक असे नामकरण करून 15 ऑगस्टला सकाळी दहा वाजता नामफलकाचे अनावरण करण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

भर पावसातही मराठा कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. यावेळी आरक्षणाच्या मागणीच्या तसेच शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आला. मराठा आंदोलनाला विविध समाजाच्या लोकांनीही पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रगीताने दुपारी दीडच्या सुमारास ठिय्या आंदोलनाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.