Talegaon Dabhade : सुदाम भेगडे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी केबल मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या केबलमध्ये बुलेटचे चाक अडकून तळेगाव दाभाडे येथील भाजपा कार्यकर्ते सुदाम तुकाराम भेगडे (वय 48) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. ही घटना शुक्रवारी (दि. 5 जुलै ) दुपारी चारच्या सुमारास जिजामाता चौक ते स्टेशन रस्त्यावर काका हलवाई स्वीट सेंटरच्या समोर घडली होती. या अपघात प्रकरणी DEN केबल कंपनीच्या मालकाच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन चौक ते जिजामाता चौक दरम्यानच्या रस्त्यावर DEN केबल कंपनीची केबल झाडांवरून टाकण्यात आली आहे. तसेच काही परिसरात ही केबल रस्त्यावर आलेली आहे. शुक्रवारी पाच जुलै रोजी सुदाम हे त्यांच्या बुलेट (एम एच 14 / जी ई 8715) वरून जात होते. जिजामाता चौकाकडे जात असताना काका हलवाई मिठाई दुकानाच्या समोर आले असता त्याठिकाणी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली केबल सुदाम यांच्या बुलेटमध्ये अडकली. केबल अडकल्याने बुलेटचे चाक जाम झाले आणि सुदाम रस्त्यावरती पडून गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. केबल कंपनीने अंथरलेल्या केबलची वेळोवेळी पाहणी करणे आवश्यक आहे. कंपनीने या कामात निष्काळजीपणा केल्याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.