Talegaon Dabhade: पुरंदरच्या मोबदल्यात मावळची जागा मिळण्याचा काँग्रेस नेत्यांना विश्वास!

(प्रभाकर तुमकर)

एमपीसी न्यूज – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम बोलणी उद्या (सोमवारी) मुंबईत होणार असून पुरंदरच्या मोबदल्यात मावळ मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल, असा दांडगा आत्मविश्वास संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे व चंद्रकांत सातकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना व्यक्त केला, मात्र मावळात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मावळ विधानसभा मतदारसंघ गेली चार निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात होता, मात्र त्यात पराजयाचा झिरो बॅलन्स कायम राहिला. ही खाते- फोड करून त्यात विजयाची मुदत ठेव देण्यासाठी काँग्रेस सक्रिय झाली असून प्रदेशाध्यक्षांकडे केलेल्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ आणि पुरंदर ह्या मतदार संघातील पराभवाचा ‘जांगड गुत्ता’ सोडविण्यासाठी पुरंदर राष्ट्रवादीला तर मावळ काँग्रेसला देत आदला-बदली होण्याची दाट शक्यता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे दाभाडे आणि सातकर हे दोन्ही नेते काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीशी एकनिष्ठ असल्याचे सांगत असून आघाडीचा जो कोणी पण उमेदवार असेल त्यांचे काम करणार आहेत. पक्षाचा आदेश मिळेल त्या उमेदवाराचे काम करण्यास कट्टीबद्ध असल्याचे या दोन्ही नेत्यांनी सांगितले.

आचार संहिता शनिवारी लागू झाल्यापासून या घडामोडीला विशेष वेग आला असून उद्या मुंबईत होणाऱ्या आघाडीच्या जागा वाटपांचा अंतिम निर्णयात मावळ आणि पुरंदरमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस जागा बदल करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

उमेदवार कोण असेल, असा प्रश्न विचारला असता माऊली दाभाडे म्हणाले की, आमचा संभाव्य उमेदवार निश्चित झाला आहे, मात्र नावाचा पत्ता ओपन करून विरोधकांना आयती संधी इतक्या लवकर देणार नाही. अर्ज भरण्याच्या-मुदतीत योग्य वेळी उमेदवाराच्या नावाचा पत्ता ओपन केला जाईल.

चंद्रकांत सातकर यांच्या मते काँग्रेसचे उमेदवार माऊली दाभाडे असतील व आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेस नेहमीप्रमाणे एकनिष्ठतेने काम करील.

याबाबत छेडले असता माऊली दाभाडे म्हणाले की, ते उमेदवारीसाठी इच्छुक नसून पक्षाला आणि युवकांना संधी देण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोणत्या उमेदवाराला संधी मिळणार या प्रश्नाला त्यांनी कसलेलं राजकीय उत्तर देत बगल दिली.

मावळ तालुक्यातील लढत ही अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. भाजपात प्रथमच तीव्र राजकीय महत्वाकांक्षा असलेले तीन इच्छुक उमेदवार आहेत. यात कोण टिकतो, कोण माघार घेतो की कोण लढतो यावर भाजपाच्या अधिकृत उमेदवाराचे भवितव्य ठरेल. मात्र माघार घेणा-याचे राजकीय अस्तित्वही पणाला लागलेले असणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार कोण असेल आणि राष्ट्रवादीतील गटा-तटाचे राजकारण कोणाच्या किती पाठीशी उभे राहील तसेच भाजपातील बंडखोरी उफाळली तर कितपत यशाची शक्यता असेल यावर विजयाचे गणित अवलंबून राहील. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.