Talegaon Dabhade: संरक्षण खात्याच्या गुणवत्ता आश्वासन नियंत्रणालयाच्या (CQAME) नियंत्रक संध्या काकडे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त

Talegaon Dabhade: Controller of CQAME, Khadki, Sandhya Kakade retires after long service सहकाऱ्यांनी निरोप समारंभात केला संध्या काकडे यांच्या कार्याचा गौरव

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील रहिवासी संध्या श्रीपाद काकडे या भारत सरकारच्या संरक्षण विभाग खडकी येथील गुणवत्ता आश्वासन नियंत्रणालयाच्या (CQAME) नियंत्रक या पदावरून नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. काकडे यांनी या विभागात 38 वर्षांची प्रदीर्घ सेवा करून आपले योगदान दिले. 

भारत सरकारच्या संरक्षण विभागात उच्चपदावर कार्यरत राहून 38 वर्षाची मोठी सेवा पूर्ण केली. त्यानिमित्ताने दि 31 मे 2020 रोजी सेवापूर्ती निमित्ताने संरक्षण विभागाच्या वतीने निरोप समारंभानिमित्त सत्कार व गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सरंक्षण खात्याचे प्रभारी अधिकारी डाॅ. उपाध्याय व  पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संध्या काकडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करून पुढील काळासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रम सुरक्षित अंतर राखून संपन्न झाला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील शिक्षण विभागातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिवंगत बाबासाहेब जयवंतराव देशमुख आणि दिवंगत  मुख्याध्यापिका कुंदा बाबासाहेब देशमुख या उभयंतांची संध्या काकडे ह्या ज्येष्ठ कन्या होत.

संध्या काकडे यांनी प्राथमिक शिक्षण नगरपरिषदेच्या जीवन शिक्षण मंदिर (कन्याशाळा) शाळेत तर माध्यमिक शिक्षण अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर (नूतन विद्या मंदिर) येथून पूर्ण केले. आपली कुशाग्र बुद्धीमत्ता, जिद्द, चिकाटी व मेहनत या गुणांच्या जोरावर काकडे या पुणे विद्यापीठाची एमएससी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. तसेच त्यांनी दोन वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन भारत सरकारच्या संरक्षण विभागात उच्च पदावर कार्यरत राहून देशसेवा केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बेल्हे यांनी केले. सुरेश बाबू यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचे प्रसारण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.