Talegaon Dabhade: पाहा… कोरोनाबाधित महिलेचे रुग्णालयातून पलायनाट्याचा व्हिडिओ!

Talegaon Dabhade: Corona-infected woman escapes from mimer Hospital, staff finds her in an hour and a half या महिलेने बुधवारी सायंकाळी कर्मचा-यांची नजर चुकवून सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन पळ काढला होता. ती महिला दगड फेकून मारत असल्याने तिला पकडणेही अवघड झाले होते.

एमपीसी न्यूज- उपचारासाठी दाखल कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना मायमर रुग्णालयात घडली. कर्मचाऱ्यांची नजर चुकवून 45 वर्षीय कोरोनाबाधित महिलेने सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन पलायन केले होते. ही घटना बुधवारी (दि.8) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती. सुमारे दीड तासांच्या शोध मोहिमेनंतर त्या महिलेला पुन्हा ताब्यात घेण्यात आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

गत शुक्रवारी (दि.3) संबंधित महिलेला मायमर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेने बुधवारी सायंकाळी कर्मचा-यांची नजर चुकवून सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन पळ काढला होता.

ही घटना कर्मचा-यांच्या लक्षात येताच पोलीस व नागरिकांच्या मदतीने सुमारे दीड तासानंतर तिचा शोध लागला. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत ती महिला लपून बसली होती. हातात लोखंडी गज आणि विट घेतली होती. ती महिला दगड फेकून मारत असल्याने तिला पकडण्यासाठी जवळ जाणेही कठीण झाले होते.

त्या रुग्ण महिलेला बोलण्यात गुंतवून पीपीई किट घातलेल्या चार कर्मचाऱ्यांनी पाठीमागील बाजूने इमारतीत प्रवेश करून तिला पकडले आणि रुग्णवाहिकेत घालून अखेर कसे-बसे पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

ही महिला कामशेतची रहिवासी असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. आजारामुळे महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.