Talegaon Dabhade: हुश्श! अखेर ‘त्या’ कोरोना संशयिताचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’!

एमपीसी न्यूज – शासनाच्या टाळेबंदी, जमावबंदी, संचारबंदी अशा सर्वच आदेशांचे पालन करीत तळेगावकरांनी आतापर्यंत शहर कोरोनामुक्त ठेवण्यात यश मिळविले होते, मात्र रविवारी सकाळी जोशीवाडा भागात बाहेरून आलेला एक 28 वर्षीय परप्रांतीय कोरोना संशयित आढळल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते, मात्र त्या संशयिताचा कोरोना निदान चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि 14 मार्च पासून  पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र,  तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासन व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आदींनी जंग जंग पछाडले आणि उत्तम प्रकारे काम करून 11 एप्रिलपर्यंत एकही संशयित व्यक्ती तपासणीसाठी पुढे पाठवली नव्हती.  रविवारी (12 एप्रिल) सकाळी अकराच्या सुमारास जोशीवाडा भागात ताप, सर्दी अशी लक्षणे असलेली एक संशयित व्यक्ती आढळली आणि तळेगाव शहरात एकच सन्नाटा पसरला, सर्वजण भयभीत झाले. त्या संशयिताला स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेऊन पुढील  तपासणीसाठी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात पाठविले होते. त्याच्या प्राथमिक तपासणी अहवालाच्या प्रतिक्षेत सर्व तळेगावकर होते.

अखेर रात्री उशिरा त्या संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रवीण कानडे यांनी सांगितले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला आणि दिवसभर झालेली घबराट ओसरली. आणि लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कोरोनाच्या विरोधात पुन्हा कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी नव्या जोमाने कामाला लागले.

संबंधित व्यक्ती ही परप्रांतीय असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असे. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही व्यक्ती बाहेरून चालत चालत तळेगावमध्ये आश्रयाला आली होती. बाहेरच मिळेल ते खाऊन ती जागा मिळेल तिथे ती राहात होती. त्या व्यक्तीला ताप आला तसेच सर्दी-खोकला ही कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तातडीने त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. या रुग्णाला खोकला, डोकेदुखी व ताप असा साधा आजार असल्याचे तपासणीनंतर डॉक्टरांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.