Talegaon Dabhade : ‘कोरोना’मुळे तळेगाव हद्दीत गुरुवार, शुक्रवारी ‘पूर्णपणे लॉकडाऊन’ पाळणार; दवाखाने, औषध दुकाने वगळून सर्व बंद राहणार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विषाणूचा संसर्ग वाढू नये. तळेगावकरांच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने, साथरोग प्रतिबंध अधिनियम1897 (एपिडमिक)मधील तरतुदीनुसार गुरुवार (दि ९) आणि शुक्रवार (दि १०) या दोन दिवशी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील दवाखाने आणि औषध दुकाने सोडून सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील, अशी माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली. यासाठी गुरुवार (दि ९) आणि शुक्रवार (दि १०) या दोन दिवशी तळेगाव हद्दीत पूर्णपणे लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून स्थापन केलेल्या स्थानिक समन्वय समितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सभागृहनेते अमोल शेटे, तळेगाव शहर भाजपचे माजी अध्यक्ष संतोष दाभाडे, जनसेवा विकास समितीचे प्रमुख किशोर आवारे, नगरसेवक निखील भगत, उद्योजक संतोष शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीमध्ये गुरुवार (दि ९) आणि शुक्रवार (दि १०) या दोन दिवशी तळेगाव हद्दीत पूर्णपणे लॉकडाऊन पुकारण्यात आला असून या कालावधीमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत दूधवाले, तसेच दवाखाने व औषध दुकाने हेच चालू राहीतील तर किराणा दुकान,भाजीपाला, फळविक्री, इत्यादी अत्यावश्यक सेवा दोन दिवस पूर्ण बंद राहतील. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच नागरिक कामानिमित बाहेर येतील. विनाकारण फिरणा-यांना पोलीसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

कोरोना विषाणूचा संसर्ग तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत वाढू नये. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून सर्वांनी सहकार्य करावे. कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक समन्वय समितीकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.