Talegaon Dabhade Crime News : तळेगाव-चाकण मार्गावर खड्डा चुकवताना दोन कंटेनरचा अपघात; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या आकाराचा खड्डा चुकवताना दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अघातात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 17) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास तोलानी गेट समोर, इंदोरी येथे घडला. यात दोन्ही कंटेनरच्या कॅबिनचे नुकसान झाले.

विकास (वय 35, रा. बिहार) असे मृत कंटेनर चालकाचे नाव आहे. उद्धव पोपट नाकाडे (वय 40, रा. ढोर जळगाव, ता. शेगाव, जि. अहमदनगर) गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या आकाराचा खड्डा चुकविताना चाकण बाजूला जाणारा (कंटेनर क्रमांक एमएच 46 एच 3710) चालक विकास (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांचा  कंटेनर समोरून मुंबई बाजूला जाणाऱ्या (कंटेनर क्रमांक एमएच 40 बीएल 9071)  चालक उद्धव नाकाडे यांच्या कंटेनर समोरासमोर धडकला. यात विकास याला गंभीर जखमा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर उद्धव नाकाडे हा गंभीर जखमी झाला.

रात्री पावणेबारा वाजता घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मारुती मदेवाड व पोलीस हवालदार प्रशांत भोसले यांनी कॅबिनमध्ये अडकलेल्या मृत व जखमींना बाहेर काढले. पोलीस उपनिरीक्षक मारुती मदेवाड तपास करत आहेत.

खड्यामुळे जातोय जीव

तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय महामार्गाच्या मोठया आकाराच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवित हानी होत आहे. आणखी किती व्यक्तींच्या बळीची प्रतीक्षा आहे, असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला. अपघातानंतर काही तास वाहतूक कोंडी झाली. आतातरी खड्डे बुजविणार का? असा सवाल केला जात आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता वैशाली भुजबळ यांनी बुधवारी (दि. 16 ) सांगितले होते की, हे खड्डे ठेकेदार दुरुस्त करणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच खड्डे दुरुस्त केले असते तर अपघात टळला असता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.