Talegaon Dabhade : सीआरपीएफच्या जवानांनीही दिला ग्रामस्थांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज – कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तळेगाव शहरात असणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 242 बटालियनच्या वतीने आसपासच्या गावातील ग्रामस्थांसाठी ‘नागरिक सहायता कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता.  यावेळी उपमहानिरीक्षक डी. एस. रावत यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना जंतुनाशक औषधे, सॅनिटायझर, मास्क आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

शुक्रवार (दि. 10) ते रविवार (दि. 12) या कालावधीत नागरिक सहायता कार्यक्रमांतर्गत मावळ तालुक्यातील ओव्हळे, आढले, दिवड, डोणे या गावात पोलीस उपमहानिरीक्षक डी. एस. रावत यांच्या मार्गदर्शनाखाली बटालियन 242 चे निदेशक एच. एस. कालस, सहाय्यक उपनिरीक्षक हिंदुराव साळुंखे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये स्प्रे पंप, सोडियम हायपो क्लोराइट, ब्लिचिंग पावडर, फिनाईल, डेटॉल साबण, हँडवॉश, सॅनिटायझर, हँड ग्लोज, मास्क आदी वस्तूंचा समावेश होता.

यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य व पोलीस प्रतिनिधीच्या उपस्थितीत संपूर्ण गावात सोडियम हायपो क्लोराइट ची फवारणी करण्यात आली.

याप्रसंगी कमाडंट एच. एस. कालस यांनी ग्रामस्थांना साबणाने योग्य प्रकारे  हात कसे धुवावेत, सॅनिटायझर व मास्कचा वापर कशा प्रकारे करावा, याविषयी माहिती दिली व त्यांनी स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कोरोनापासून कशाप्रकारे बचाव करता येईल, याबाबत जनजागृती करून ग्रामस्थांचे कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी मनोबल वाढवले.

यावेळी नागरिकांनी कोरोनाच्या संकटाशी लढण्याचा संकल्प केला व मदतीसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या २४२ बटालियनचे मनःपूर्वक आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.