Talegaon Dabhade:  रेल्वेच्या धडकेने डेअरीचालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – उद्यान एक्सप्रेसच्या धडकेने तळेगाव दाभाडे येथील एका डेअरीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.13) तळेगाव दाभाडे हद्दीत बनेश्वर मंदिर ते घोरावाडी रेल्वे स्थानक या दरम्यान येथे सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली. 

विजय गणपत निगडेकर (वय 52, रा. तळेगाव दाभाडे) असे मृत डेअरीचालकाचे नाव आहे. ते गेली अनेक वर्षे श्रद्धा डेअरी नावाने व्यवसाय करीत होते.

_MPC_DIR_MPU_II

तळेगाव रेल्वे लोहमार्ग हवालदार संजय तोडमाल यांनी याबाबतची माहिती दिली. शुक्रवारी उद्यान एक्सप्रेसच्या धडकेने एकाचा मृत्यू झाल्याची खबर मिळाली. त्यानुसार लोहमार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले. चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे मृताची ओळख पटविणे अवघड होते. त्यांच्या शर्टवर टेलरच्या नावाचे लेबल होते. पोलिसांनी गुगलवर टेलरचे नाव शोधले. तर, टेलर तळेगावमधील असल्याचे समजले. टेलरला कपडे आणि बूट दाखविल्यावर त्यांनी निगडेकर यांचे कपडे ओळखले. त्यानंतर पोलिसांनी निगडेकर यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला व दुर्घटनेची माहिती दिली.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे. तळेगाव लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.