Talegaon Dabhade: महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या समितीची स्थापना करण्याची सह्याद्री विद्यार्थी अकादमीची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात पोस्को आणि पॉस कायद्यांतर्गत महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या समितीची स्थापना करून त्वरित कार्यान्वयित करा, अशी मागणी करत सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संभाजी मलघे यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील इतर महाविद्यालयांना पुढील दोन दिवसांत निवेदन देणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

देशभरात विद्यार्थिनींवर महाविद्यालयात होणाऱ्या अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यासाठी प्रशासनाने विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशाखा समिती तसेच पोस्को व पॉस कायद्यांतर्गत समिती स्थापना करण्याची सूचना सर्व महाविद्यालयांना दिलेली असून कोणत्याही महाविद्यालयाकडून तशी कार्यवाही झालेली दिसून येत नाही.

तरी, पंधरा दिवसांच्या आत समित्या स्थापन करून त्या त्वरित कार्यान्वयित करण्यात याव्यात. अन्यथा, अकादमीच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना लाठ्याकाठ्यांचे वाटप करून संरक्षणाचे धडे देण्यात येतील, असा इशारा अकादमीच्या वतीने मावळ तालुक्यातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आला आहे.

यावेळी सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख चेतन वाघमारे, मावळ तालुकाप्रमुख किरण ढोरे, तळेगाव शहर अध्यक्ष सागर गवारे, मयूर येवले, मोहित बाथम, अक्षय ढोरे आणि रोहित गराडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.