BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : ‘पक्षशिस्तीचे पालन करणार्‍या रवींद्र भेगडे यांना उमेदवारी द्या’

भाजपा कार्यकर्त्यांची मागणी

एमपीसी न्यूज- वारंवार अन्याय होऊन देखील पक्षशिस्तीचे पालन करत भाजपच्या ध्येय धोरणांशी एकनिष्ठ राहणारे भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांना मावळ विधानसभेची उमेदवारी द्या अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे. मावळात विधानसभेच्या तिकिट वाटपाचा तिढा निर्माण झाल्यास पक्ष शिस्तीला लागबोट लावणार्‍यांपेक्षा पक्षशिस्तीचा आदर व पालन करणार्‍या रवींद्र भेगडे यांच्या गळ्यात मावळच्या उमेदवाराची माळ पडण्याची शक्यता बळावली असल्याची तालुक्यात सर्वत्र चर्चा आहे.

मावळ तालुक्यात मागील 25 वर्षापासून भाजपाची सत्ता आहे. रुपलेखा ढोरे यांनी पाच वर्ष व त्यानंतर दिगंबर भेगडे यांनी दहा व संजय तथा बाळा भेगडे यांनी दहा वर्ष मावळ तालुक्याचे नेतृत्व केले आहे. बाळा भेगडे सध्या राज्यमंत्री असल्याने त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांचे समर्थक करत असले तरी मावळात भाजपने आजपर्यत दोनपेक्षा अधिक वेळा कोणाला उमेदवारी दिलेली नसल्याने अन्य इच्छुक वेगाने कामाला लागले आहेत.

रवींद्र भेगडे यांचे समर्थक म्हणाले की, मागील पंधरा वर्षापासून रवींद्र भेगडे भाजपात सक्रिय आहेत. मागील पंचवार्षिक काळात त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्या नंतर जिल्हा परिषदेची उमेदवारी सुद्धा नाकारण्यात आली.

युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना दोन पदे निर्माण करत त्यांच्या कामाला खो घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. असे असताना देखील रवींद्र भेगडे हे पक्षाच्या शिस्तीला धरुन काम करत राहिले. मागील पाच वर्षात त्यांनी जनसामान्यांकरिता केलेली कामे प्रशंसनीय आहेत. कसलाही गाजावाजा न करत नम्रपणे केलेल्या कामांची पावती त्यांना आता गावभेटी दरम्यान मिळत आहे. गावोगावी नागरिकांचा मोठा प्रतिसाद रवींद्र भेगडे यांना मिळत असल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बळावली आहे, असे रवींद्र भेगडे यांच्या समर्थकांचे मत आहे.

HB_POST_END_FTR-A2

.