Talegaon Dabhade : नव्याने बांधलेल्या दोन्ही व्यापारी संकुलामध्ये विस्थापित टपरीधारकांना प्राधान्य देण्याची मागणी

तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषदेने नव्याने बांधलेल्या मारुती मंदिर चौक आणि जिजामाता चौकातील व्यापारी संकुलातील गाळे दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वातील वाटपामध्ये त्या जागांवरील पूर्वीच्या विस्थापित टपरीधारकांना प्राधान्य क्रमाने वाटप करण्यात यावे अशी मागणी तळेगाव शहर विकास व सुधारणा समितीचे गटनेते किशोर भेगडे यांनी मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात भेगडे यांनी म्हटले आहे की, नगरपरिषदेने मारुती मंदिर चौकात एकूण तीन इमारतीमध्ये 72 गाळे आणि 6 कार्यालये, तसेच जिजामाता चौकात 44 गाळे असलेल्या अत्याधुनिक पध्दतीच्या व सर्व सोयी, सुविधायुक्त अशा व्यापारी संकुलाच्या इमारतीची बांधकामे पूर्ण केली आहेत.
त्याचे वाटप शासनाच्या नियमाप्रमाणे ई- लिलाव (On Line) पध्दतीने दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर इच्छुक व्यावसायिकांना करण्यात येणार आहे. ही लिलाव पध्दत दि. 17 ते 27 मे पर्यंतच्या मुदतीत कार्यरत राहणार आहे.

मारुती मंदिर चौक आणि जिजामाता चौक येथे पूर्वी स्थानिक व्यावसायिकांच्या टप-या होत्या. त्या टप-या ताब्यात घेताना सदर टपरीधारकांचे पुनर्वसन करण्याचा शब्द पूर्वीच्या प्रशासनाने दिला होता. त्याप्रमाणे या विस्थापित टपरीधारकांना या नवीन संकुलामध्ये प्राधान्यक्रमाने गाळे देऊन त्यांचे पुनर्वसन करावे. तसेच गाळ्यांच्या लिलावामध्ये आकारण्यात आलेली डिपॉझिटची रक्कम सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरील आहे. एवढी रक्कम भरून व्यवसाय करणे त्यांच्यासाठी शक्य नाही त्यामुळे लिलाव प्रक्रिया राबवताना अगोदर तळेगाव हद्दीमधील दिव्यांगांसाठी तळमजल्यावर किंवा पहिल्या मजल्यावर गाळे आरक्षित करून दोन्ही ठिकाणच्या टपरीधारकांना प्राधान्य द्यावे तसेच त्यांच्याकडून नाममात्र अनामत रक्कम आणि भाडे आकारावे अशी मागणी भेगडे यांनी लेखी निवेदनात केली आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेची अत्याधुनिक व्यापारी संकुले

१) मारुती मंदिर चौक व्यापारी संकुल

२) जिजामाता चौक व्यापारी संकुल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.