Talegaon Dabhade : चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या मालमत्ता कराची वसुली थांबवण्याची मागणी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने चुकीच्या पध्दतीने आकारलेल्या मालमत्ताकर बिलाची व पाणीबिलाची वाढीव बिले वसुली ताबडतोब थांबवावी, अशी लेखी मागणी शहर विकास व सुधारणा समितीकडून करण्यात आली. अन्यथा या विरुध्द येत्या गुरुवार (दि. 28) पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी वैभव आवारे यांना देण्यात आले आहे. यावेळी तळेगाव शहर विकास व सुधारणा समितीचे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, आनंद भेगडे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे उपस्थित होते.

याबाबत दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने वार्षिक करआकारणीचे कारण पुढे करत चुकीच्या पध्दतीने करामध्ये भरमसाट वाढ केली असून या सर्वेक्षणात मालमत्ता धारकांची चुकीची नावे, चुकीचे क्षेत्रफळ, भाडे मालकांची नावे, मागील चुकीची थकबाकी अश्या असंख्य चुका असलेली बिले मालमत्ता धारकांना पाठविण्यात आलेली आहेत. करआकारणीचे काम ज्या संस्थेला दिले होते त्यांनी ते काम चुकीच्या पद्धतीने केले असून, नागरिकांवर करवाढ लादली आहे. अकरा हजारांहून अधिक नागरिकांनी करवाढीबाबत लेखी हरकती दिल्या होत्या. मात्र सुनावणीच्या नावाखाली केवळ देखावा करण्यात आला असून जाणूनबूजून नागरिकांचे आर्थिक व मानसिक शोषण करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शहरातील मालमत्ताचे सर्वेक्षण करणा-या संस्थेला मात्र नगरपरिषदेने त्यांच्या कामाची बिले अदा केलेली आहेत. संबधित ठेकेदारांची यापुढील बिले सर्वेक्षणातील दुरुस्त्या पूर्ण केल्याशिवाय देऊ नये अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

करवाढीची वसुली थांबवावी, नव्याने सर्व मिळकतीचे सर्वेक्षण करावे, तोपर्यंत मागीलप्रमाणे कराची वसुली करावी, तसेच मीटर न बसवता मीटर रीडींगप्रमाणे दिलेल्या बिलांची वसुली थांबवावी आणि नवीन अध्यादेशाप्रमाणे एक हजार स्क्वेअर फुटांपर्यंतच्या सर्व अनधिकृत मिळकतीचा शास्तीकर माफ करावा, अन्यथा येत्या गुरूवारपासून नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.