Talegaon Dabhade : ऐतिहासिक तळ्याची दुरावस्था; जागतिक पर्यावरण दिनी मनसे स्टाईलने प्रशासनाला विचारणार जाब

एमपीसी न्यूज – श्रीमंत सरदार दाभाडे घराण्याने बांधलेल्या ऐतिहासिक तळ्याची दुरावस्था झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक इमारतींचे सांडपाणी, मैलापाणी या तलावात साचत आहे. तळयातील जैव विविधता धोक्यात आली असल्याने सोमवारी (दि. 5) तळेगाव (Talegaon Dabhade) मनसेच्या वतीने मनसे स्टाईलने नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे, अशी माहिती शहर अध्यक्ष सूरज भेगडे आणि तालुका प्रसिध्दी प्रमुख तानाजी तोडकर यांनी दिली आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून शहर मनसे ने गावभागातील सुमारे 80 एकर क्षेत्रावर असलेल्या ऐतिहासिक तळ्यातील पाण्याची दुरवस्था दूर करण्यासाठी जनजागृती आणि नगरपालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी आक्रमक मोहिम हाती घेतली आहे. वारंवार निवेदने आणि स्मरणपत्रे देवूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने येत्या सोमवारी(5 जून) मुख्याधिकारी आणि संबंधीत विभागांच्या अधिका-यांना मनसे स्टाईलने जाब विचारणार असल्याचे शहर अध्यक्ष सूरज भेगडे आणि तालुका प्रसिध्दी प्रमुख तानाजी तोडकर यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, शनिवारी सकाळी पत्रकारांसमवेत तळ्याचा पाहणी दौरा आयोजित केला असताना परिसरातील इमारतींचे सांडपाणी व मैलापाणी नगरपालिकेच्या अर्धवट सोडलेल्या पाईपलाईन मधून थेट तळ्यात साचत असल्याचे दिसले. ड्रेनेज पाईपलाईनचे काम 90 टक्के पूर्ण असून उर्वरित दहा टक्के काम गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित ठेवल्याने दररोज लाखोलिटर मैलापाणी तळ्यात जात असल्याने तळ्यातील पाणी प्रदुषित झाले आहे. त्यामुळे तेथील जैवविविधता धोक्यात आली असल्याचा आरोप भेगडे यांनी केला. नियमाप्रमाणे परिसरातील उंच इमारतींना एसटीपी प्लान्ट सुस्थितीत असणे बंधनकारक असताना त्याकडे कानाडोळा करत कम्प्लिशन सर्टिफिकेट्स कसे दिले गेले, असा सवालही त्यांनी केला. तळ्याचे पर्यावरणच धोक्यात आणल्याबद्दल प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे मुख्याधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे भेगडे म्हणाले.
याबाबत पूर्वी लेखी निवेदने देण्यात आली असून मुख्याधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. येत्या दोन दिवसात योग्य ती उपाययोजना न केल्यास पर्यावरण दिनी त्यांना (Talegaon Dabhade) अव-मानपत्र देवून सत्कार करणार असल्याचे ते म्हणाले. श्रीमंत सरदार दाभाडे घराण्याने बांधलेल्या या तळ्याचे वैभव नगरपालिकेमुळे तळास जात असल्याने लोकसहभागातून मनसेचे कार्यकर्ते आक्रमक आंदोलन करणार असल्याचे तानाजी तोडकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.