Talegaon Dabhade : नृृृृत्य, नाट्य, संगीताच्या बहारदार आविष्काराने रंंगली ‘कलापिनी’ची दिवाळी पहाट !

एमपीसी न्यूज- ‘नरकचतुर्दशीच्या पहाटे अभ्‍यंगस्‍नान आणि ‘कलापिनी’त आनंदाची सुरेल तान’, या काव्यपंक्‍तीचा अनुभव देणारी कलापिनी व हिंदविजय नागरी पतसंस्‍था आयोजित दिवाळी पहाट उत्‍साहात संपन्न झाली. ‘आम्‍ही चालवू हा पुढे वारसा’ या कार्यक्रमातून, दिवाळी पहाटचे प्रणेते कै. पंडित शरदराव जोशी यांना नृत्‍य, नाट्य व संगीताच्या माध्यमातून स्‍वरमय मानवंदना देण्यात आली.

यावेळी हिंदविजय नागरी पतसंस्‍थेचे संस्‍थापक रवींद्र दाभाडे आणि सर्व संचालक मंडळ, कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्‍यंकर, उपाध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्‍थित होते.

नादब्रह्म संगीतालयाच्या विनायक लिमये आणि सहकार्‍यांनी सादर केलेल्‍या वागीश्वरी स्‍तोत्राने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विभावरी बांधवकर यांनी सादर केलेल्‍या शास्‍त्रीय संगीतामध्ये कै. पं. शरदराव जोशी यांची रागमाला तसेच भूप रागातील तराणा सादर केला. त्यानंतर कीर्ती ढेंबे यांनी गणेश वंदना हे नृत्‍य सादर केले. त्‍याला प्राची गुप्ते, मैथील देशपांडे आणि मैथीली मुळे देशपांडे यांनी संगीतसाथ केली.

संपदा थिटे यांनी ‘पहाटेच्या पारी’ हे पति गेले गं काठेवाडी या नाटकातील कै. पं. शरद जोशी यांनी संगीतबद्ध केलेले गीत सादर केले. राजीव कुमठेकर, प्राची गुप्ते, मैथील मुळे देशपांडे, दीपक आपटे यांनी ‘सं. बिलासखानी तोडी, सं. चैती, सं. धन्य ते गायनी कळा’ या नाटकांची नांदी मालिका सादर केली. यानंतर शरद जोशी यांनी संगीतबद्ध केलेली सरगममाला, मीनल कुलकर्णी आणि सहकारी यांनी नृत्‍यातून सादर केली. संपदा थिटे यांनी सरगममालेचे गायन केले. उभरती कलाकार हिमाली देशमुख हिने ‘रामा रघुनंदना’ हे गीत सादर केले. संपदा थिटे यांनी कै. पं. शरदराव जोशी यांचे संगीत दिग्‍दर्शन केलेल्‍या संगीत बिलासखानी तोडी नाटकातील बंदिश प्रभावीपणे सादर केली. वृंदावन कुंजभवन या शरद जोशी यांच्या आणखी एका रचनेवर मीनल कुलकर्णी आणि सहकारी यांनी नृत्‍य सादर केले. यानंतर वसुबारस ते भाऊबीज या दिवाळीच्या प्रत्‍येक दिवसावर आधारित ‘दिवाळी गीते’ अनुजा झेंड व सहकार्‍यांनी नृत्‍यासहित सादर केली.

कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्‍यंकर यांच्या हस्‍ते हिंदविजय नागरी पतसंस्‍थेचे संस्‍थापक रवींद्र दाभाडे आणि सर्व संचालक मंडळाचा सत्‍कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना रविंद्र दाभाडे यांनी कलापिनीच्या सर्व कार्यक्रमांना तसेच नवीन रंगमंचाच्या उभारणीस शक्‍य तेवढी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ‘कलापिनी कालदर्शिका 2020’ चा मुहूर्त करण्यात आला.

मध्यंतरानंतर बालभवनच्या बालकलाकारांनी ‘झगमग दिवाळी’ या गाण्यावर मधुवंती रानडे दिग्‍दर्शित नृत्‍य सादर केले. ऋतुजा उगीले हिने ‘मन रानात गेलं गं’ आणि मेधा रानडे यांनी ‘आला खुशीत समिंदर’ ही गीते सादर केली. कुमारभवनच्या कलाकारांनी ‘झाड एक तरी लावू या’ या गीतावर अनघा कुलकर्णी दिग्‍दर्शित बहारदार नृत्‍य सादर केले. यानंतर विनायक लिमये आणि सहकार्‍यांनी सादर केलेल्‍या ‘दादला नको गं बाई’ या भारुडाने रसिकांना ठेवा धरायला लावला.

कै. पद्माकर प्रधान स्‍मृती संगीत स्‍पर्धेतील पारितोषिक विजेते, सावनी परगी, अश्विनी कुलकर्णी आणि अक्षय म्‍हाप्रळकर या कलाकारांनी, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्‍या गीतांची मेडले सादर केली. ढोलकीवर साथ करणार्‍या अजय शिंदे यांच्या ढोलकी वादनाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. त्यानंतर ‘खेळ मांडियेला वाळवंटी’ या अभंगावर सृजन नृत्‍यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्‍य सादर केले.

विशाखा बेके आणि दिनेश कुलकर्णी यांच्या कवितावाचनाने रसिकांची दाद मिळविली. सर्व कलाकारांनी सादर केलेल्‍या ‘आम्‍ही चालवू हा पुढे वारसा’ या सामुहिक गीताने आणि ‘सर्वात्‍मका सर्वेश्वरा’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्‍वी सादरीकरणावरून सर्व कलाकारांनी याप्रसंगी ढळकपणे स्‍मरण झालेल्‍या कै. डॉ. शं. वा. परांजपे, कै. बाळासाहेब गद्रे, कै. डॉ. टुमणे आणि कै. पं. शरदराव जोशी या कलापिनीच्या अर्ध्वयुंचा वारसा पुढे चालवला जाईल तसेच नवीन रंगमंचाचे काम तातडीने पूर्णत्‍वाला जाईल हा विश्वास निर्माण झाला.

मंगेश राजहंस, अजय शिंदे, अनिरुद्ध जोशी, प्रवीण ढवळे यांनी तालाची बाजू उत्तम सांभाळली. प्रदीप जोशी, सतीश वैद्य यांनी संवादिनीवर तर राजेश झिरपे यांनी सिंथेसायझरवर यथोचित साथ केली. मधुवंती हसबनीस, डॉ. विनया केसकर, डॉ. अनंत परांजपे आणि चेतन पंडित यांनी निवेदनाची बाजू सांभाळली. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनीसंयोजन केले.

चैतन्य जोशी, प्रतिक मेहता, शार्दुल गद्रे, विनायक काळे आणि सहकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आणि सुंदर सजावट केली. कलापिनीचे सर्व कार्यकर्ते, तंत्रज्ञ यांनी कार्यक्रमाच्या यशस्‍वीतेसाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.