Talegaon Dabhade : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरगुती कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 26) इंद्रायणी कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमर अर्जुन साखरे (वय 26), अर्जुन साखरे, अनिता अर्जुन साखरे, अंकित अर्जुन साखरे (सर्व रा. इंद्रायणी कॉलनी, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन संपत शिंदे (वय 47, रा. परळी वैजनाथ, बीड) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मानसी अमर साखरे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेची नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मृत मानसी यांना लग्नात मानपान केला नाही म्हणून तसेच चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. वारंवार घालूनपाडून बोलून मानसी यांचा छळ केला. या त्रासाला कंटाळून मानसी यांनी मंगळवारी तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.