Talegaon Dabhade : माहेरहून कार आणण्याच्या मागणीस नकार दिल्यामुळे विवाहितेला ठेवले उपाशी

एमपीसी न्यूज – सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणि चारचाकी गाडी आणण्याची मागणी केली. विवाहितेने यासाठी नकार दिला. त्यावरून विवाहितेला उपाशी ठेऊन तिचा छळ केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार 28 फेब्रुवारी 2017 ते 2 डिसेंबर 2018 या कालावधीत मावळ तालुक्यातील सुदवडी सुदुंबरे येथे घडला.

माधुरी गणेश मोईकर (वय 22, रा. वाकी खुर्द, ता. खेड) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार पती गणेश कैलास मोईकर, दीर विठ्ठल कैलास मोईकर, सुनीता कैलास मोईकर, चेतन कैलास मोईकर, माधुरी चेतन मोईकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची वारंवार मागणी करून तिला अपमानास्पद वागणूक दिली. आई-वडिलांकडून पैसे घेऊन येण्यासाठी तिला वारंवार माहेरी सोडविण्यात येत होते. माहेरहून तिला परत नेण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. विवाहितेकडे वारंवार पैशांसाठी तगादा लावत तिला उपाशी ठेवून तिचा छळ केला. माहेरहून पैसे आणि कार आणली नाही तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.