Talegaon Dabhade: गौण खनिज उत्खनन प्रकरणातील दंडाची रक्कम करदात्यांच्या पैशातून भरु नका – गणेश काकडे

Don't pay fines in secondary mineral extraction cases from taxpayers' money - Ganesh Kakade नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा: अनधिकृत खोदकामाची सीआयडी चौकशी करावी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील तळ्यातील माती व मुरुमाचे अनाधिकृतरित्या उत्खनन केल्याप्रकरणी नगरपरिषदेला आकारलेला 80 कोटी रुपयांचा दंड करदात्यांच्या पैशांतून भरण्यात येवू नये. नगरपरिषदेने अनधिकृतपणे खोदकाम केले आहे. डिझेल, वाढीव दराच्या कामाची कोणतीही चौकशी न करता नगराध्यक्षांनी कोट्यवधी रुपयांची बिले काढली आहेत. यामध्ये मोठा गैरव्यहार झाला असून त्याची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी केली आहे. या गैरव्यहाराची जबाबदारी स्वीकारुन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तळेगाव-दाभाडे नगरपरीषदेच्या हद्दीतील तळ्यातील माती व मुरुम यांची अनाधिकृतरित्या उत्खनन केल्याप्रकरणी तळेगाव नगरपरीषदेला 79 कोटी 64 लाख 94 हजार 600 रुपये दंड भरण्याचे आदेश मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिले आहेत.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते काकडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची आज (शुक्रवारी) भेट घेतली. दंडाची रक्कम करदात्यांच्या पैशातून भरु नये, अशी मागणी त्यांनी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, राष्ट्रवादीचे आशिष खांडगे यावेळी उपस्थित होते.

दंड सामान्य नागरिकांनी कर स्वरुपात भरलेल्या रकमेतून देण्यात येवू नये, अशी मागणी काकडे यांनी मुख्याधिका-यांकडे केली आहे.

तळ्यातील खनिजाचे अनधिकृत खोदकाम करताना नगरपरिषेदेने कुठल्याही प्रकारची रॉयल्टी अथवा परवानगी घेतली नव्हती. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आवश्यकता असणारी तांत्रिक मंजुरी घेतली नाही. अंदाजपत्रकसुद्धा तयार केले नाही.

उत्खननातून निघलेल्या खनिजाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. त्यामध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे.

उत्खनन करताना जलसंधारण विभागाचा डीएसआर वापरणे आवश्यक असताना देखील आवश्यक डीएसआरपेक्षा अधिक दराने खोदकाम करण्यात आले. खोदकाम करताना नगरपरिषदेने कोणत्याही सक्षम अधिका-यांची नेमणूक केली नव्हती.

डिझेल आणि वाढीव दरांच्या कामाची कोणतीही चौकशी न करता नगराध्यक्षांनी कोट्यवधी रुपयांचे बिले काढली. त्यामुळे या गैरव्यहाराची सीआयडी चौकशी करावी. संबंधितांवर योग्य ती कारवाई करुन त्यांच्याकडून हा दंड वसूल करण्यात यावा.

दंडाचा बुर्धंड सर्वसामान्य लोकांना बसता कामा नये, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली आहे.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या कार्यकाळातच हे खोदकाम झाले आहे. त्यामुळे या गैरव्यहाराची जबाबदारी स्वीकारुन जगनाडे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. त्यामुळे नि:पक्षपाती चौकशी पूर्ण होऊन करदात्यांना न्याय मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

ठेकेदाराने दंड भरावा – नगराध्यक्षा चित्रा जगनाडे

तळ्यातील माती व मुरुम काढण्याच्या कामाची बाब पूर्ण प्रशासकीय आहे. अटी-शर्ती, ठरावाला सभागृहाची मान्यता घेतली आहे. सभागृहाच्या मान्यतेनेच गाळ माती उत्खननाचा विषय झाला आहे. ऑर्डर, माती नेण्याची परवानगी मुख्याधिका-यांच्या हातात असते.

सभागृहाच्या मान्यतेनेच पूर्ण प्रक्रिया झाली आहे. ठेकेदारासोबत करार केलेला आहे. जो काही दंड असेल तो ठेकेदाराने भरावा, असे नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.