Talegaon Dabhade : नाणे मावळच्या मावकर मुकादमांची समाधी उजेडात

एमपीसी न्यूज- इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे व इतिहास संशोधिका डॉ. प्रिया बोराडे यांच्या संशोधनात्मक स्थलचिकीत्सेतून बांदावरील मावकर पाटील यांची समाधी नुकतीच उजेडात आली आहे. समाधीचे स्वरूप, लिपी आणि रचना मध्ययुगातील असल्याने खंडेराव दाभाडे यांच्याआधी मौजे माउ येथील मावकर यांच्याकडे मुकादमी (मुलकी पाटीलकी) असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

मावळ तालुक्यात शिवकालातील आंदर, पवन व नाणे मावळ समाविष्ट होतात. यातील गावांचे ढोबळमानाने तीन प्रकार मध्ययुगात करण्यात आले आहेत. यात मौजे, कसबे व शहर अशा वर्गीकरणात नाणे मावळ मधील माउ हे मौजे माउ म्हणून संबोधले जाते. नाणेमावळची मोकदमी खंडेराव दाभाडे याना 1710 साली वतनी मिळकतीत शाहू छत्रपती यांनी दिली. तशा अशयाची पत्र देखील नाणेमावळ मधील देशमुख आणि देशपांडे यांना बहिरो मोरेश्वर प्रधान यांच्या मार्फत दिल्या गेली. तद्नंतर वंशपरंपरागत दाभाडे घराण्याकडे येथील मोकदमी बराच काळ राहिली. मावकर (नाणेमावळ) मंडळी लढाऊबाण्याची होती. स्वराज्यसेवेत त्यांनी बरेच वर्ष सेवा दिल्याचे दिसते. लोहगड दुर्गावर मराठी योद्ध्यांपेकी मावकर नाव येते. कोकणातील सुवर्णदुर्ग (हर्णेबंदर) येथे लढाऊ योद्धे आवश्यक असल्याने 1755 साली नानासाहेब पेशवे यांनी लोहगडहून पाठविलेल्या योद्ध्यांत गोरोजी मावकर हे होते.

_MPC_DIR_MPU_II

सदर समाधी विषयक आधिक माहिती देतांना इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले, “प्रस्तुत समाधीची मांडणी थोड्या वेगळ्या धाटणीची असून सधारणतः बहुतांश समाधीवर असलेल्या शक या कालगणनेचा उल्लेख यावर केला गेला नाही. कोरण्यासाठी जागेची कमतरता नसताना शक वा इतर कोणतीही कालगणना यावर अनावधानाने लिहायची राहीली असावी किंवा अकुशल पाथरवटाने हा कोरला असण्याचा संभव आहे. माउ या गावावरून येथील रहिवाशांना मावकर हे आडनाव प्राप्त झाले आहे” पुढील काळात नाणे व आंदर मावळचा इतिहास नव्याने उलगडणार असल्याचे डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केले.

या समाधीवर पाच ओळीचा शिलालेख असून श्री जईत पा (पाटील) (यांचे) वा(वडील) नावजी पा (पाटील) मावकर मोकदम(मुलकी पाटील) मौजे माउ तर्फ नाणे मावळ असे लिहिलेले आहे. सदर शिलालेखाच्या प्रकाशित बातमीनंतर आपल्या शेतात वा बांधावर अगर कोठेही काही लिखित बाबी दिसल्यास कृपया संपर्क करावा असे आवाहन मावळ तालुक्यातील गावकऱ्यांना करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.