Talegaon Dabhade : तोडगा न निघाल्यामुळे L&T कंपनीतील कामगारांचे बेमुदत उपोषण चौथ्या दिवशीही सुरुच

प्रकृती खालावल्याने दोन कामगार रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज – तळेगाव आंबी एम.आय.डी.सी.मधील एल अँड टी कंपनीच्या कामगारांच्या मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यामुळे चौथ्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरू असून काम बंद आंदोलनाचाही आज 15 वा दिवस होता. उपोषणास बसलेल्या चारपैकी दोन कामगारांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

L&T च्या इतर शाखामध्ये मिळणाऱ्या सोयीसुविधा तळेगाव येथील L&T (defence) डिफेन्स कंपनीमध्येही उपलब्ध व्हाव्यात, बेकायदेशीररित्या कामावरुन काढलेल्या ९ कायम कामगारांना त्वरीत कामावर रुजू करुन घ्यावे, वर्षानुवर्षे कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कामगारांना कायम कामगार म्हणून रुजू करुन घ्यावे, अशा कामगारांच्या प्रमुख मागण्या आहेत. शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अॅड. विजय पाळेकर कामगारांच्या मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

  • आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक किशोर भेगडे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष दीपक मानकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे सदस्य यशवंत पायगुडे, मावळ तालुका शिवसेना प्रमुख राजेश खांडभोर, उपाध्यक्ष मदन शेडगे, मनसेचे अशोक कुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष कैलास गायकवाड, रिपाइंचे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, अरविंद गायकवाड, विक्रम कलवडे या सर्वपक्षीय नेत्यांनी भेट देऊन मागण्या समजावून घेतल्या व या आंदोलनाला पाठिंबा दिला.

मावळ तालुक्याचे आमदार संजय तथा बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश भेगडे, सभापती गुलाब म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम आदी मान्यवरांच्या शिष्टमंडळाने कंपनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली, परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.