Talegaon Dabhade : नागरिकांना दिलासा देण्यासाठी सत्ताधारी आग्रही

करवाढ 32 टक्क्यांवरून 15 टक्के

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने प्रस्तावित केलेली 30 ते 32 टक्के करवाढ अन्यायकारक असून ती केवळ 15 टक्के करण्यासाठी सत्तारूढ भाजप, जनसेवा विकास आघाडी व आरपीआय महायुती आग्रही असल्याचे आज महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान प्रस्तावित करमूल्यांकनास लेखी हरकती घेण्यासाठी सात डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रशासनाने 2018 ते 2022 या कालावधीसाठी जारी केलेल्या  करआकारणीच्या नोटीसात काही तांत्रिक त्रुटी असून त्या दूर करण्यासाठी तसेच नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून पक्षपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा प्रभारी गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सुधारित कर मुल्यांकनानुसार केलेल्या करवाढीनंतर नागरिकात मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंतोषाची दखल घेत आज शहर भाजपा, जनसेवा विकास समिती आणि आरपीआय या सत्ताधारी पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेत त्यांची बाजू मांडण्यात आली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, विरोधीपक्ष नेत्या हेमलता खळदे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष तथा  ज्येष्ठ नगरसेवक सुनील शेळके, माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल तसेच सत्तारूढ महायुतीचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते.

गणेश भेगडे म्हणाले, की, यावेळी प्रथमच जीपीएस यंत्रणा व खासगी संस्थेची मदत घेण्यात आली. मालमत्तेच्या चटईक्षेत्रातील वाढ, अनधिकृत बांधकाम, निवासी वापराच्या जागेचा व्यावसायिक वापर, भाडेपट्ट्यावर दिलेली मालमत्ता आणि प्रशासनाकडून काही नोटीसात चुकीची आकडेमोड झाल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षण करताना झालेल्या तांत्रिक त्रुटींना दूर करण्यात येईल. नागरिकांनी देखील नोटीसांची तपासणी नीट करून त्यातील हरकतींवर लेखी आक्षेप नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.

याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी वैभव आवारे, करनिरीक्षक विजय भालेराव, नगररचनाकार शरद पाटील यांच्यासमवेत करनिर्धारण मूल्यांकन अधिकारी दत्तात्रेय काळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानुसार येत्या 7 डिसेंबर पर्यंत मागील तारीख (28 नोव्हेंबर) असलेले हरकतींचे अर्ज नगरपरिषदेत स्वीकारले जाणार असल्याचे गणेश भेगडे यांनी सांगितले.

हरकतीवरील सुनावणी 4 डिसेंबर ऐवजी आता 10 डिसेंबरला होईल. दरम्यान, नोटीसा न मिळालेल्यांना त्या तातडीने पोच करण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

तीस टक्के करवाढीतून दिलासा देण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि आमदार बाळा भेगडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. ही करवाढ 15 टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. काहींच्या बाबतील अवाजवी भाड्याची नोंद झाली असल्याने त्यात योग्य ती दुरूस्ती करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.

 नगरपरिषदेच्या अधिकारातील करातून दिलासा देण्यासाठी लवकरच विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून त्यात निवासी स्वच्छता कर पूर्णत: माफ करण्याचा तसेच अनिवासीसाठी तो ५० टक्के कमी करण्याचा ठराव मांडून मंजूर करण्यात येणार असल्याचे यावेळी इंदरमल ओसवाल यांनी सांगितले.

विरोधकांच्या भलथापांना फसू नका – शेळके

करवाढीच्या विरोधात सर्वप्रथम आपण आवाज उठवला. जास्तीत जास्त नागरिकांच्या हरकती दाखल करून घेतल्या. त्यानंतर विरोधी पक्षाच्या मंडळींना जाग आली. शहरातील काही मंडळी, विरोधक निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राजकीय फायदा लाटण्यासाठी केवळ पत्रकबाजी करून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सुनील शेळके यांनी यावेळी  केला. नागरिकांनी अशा लोकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

सहा हजार हरकती दाखल

– नगरपरिषदेकडे सहा हजारपेक्षा विक्रमी हरकतींची नोंद.

– एकूण मालमत्ताधारक ३३ हजार ८३८

– दहापटीहून जास्त करवाढ झालेल्या मालमत्ता एक हजार ९३९

– पाचपटीहून जास्त करवाढीच्या  दोन हजार १९०

– चार हजार ९४४ मिळकतींच्या कर पूर्वीपेक्षा कमी

– पाच वर्षात तब्बल पाच हजार ८३६ नव्या मिळकतींची नोंद.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.