Talegaon Dabhade : बरोबर एक महिन्याने शहरातून सर्वात मोठी विजयाची मिरवणूक काढणार – आमदार बाळा भेगडे

तळेगाव दाभाडे येथे महायुतीची पदयात्रा; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी (दि. 29) आहे. निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी आहे. या निवडणुकीत महायुतीचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे. त्या विजयाची तालुक्यातील सर्वात मोठी मिरवणूक आजपासून बरोबर एक महिन्याने काढणार आहोत. असा विश्वास मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

तळेगाव दाभाडे येथे आज (बुधवारी) महायुतीची पदयात्रा काढण्यात आली. रॅलीमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी आमदार भेगडे बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, प्रचारप्रमुख भास्करराव म्हाळसकर, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, शहराध्यक्ष संतोष दाभाडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, गणेश भेगडे, रवी आवारे, तळेगाव स्टेशन शहर प्रमुख देव खरटमल, शहर प्रमुख दत्ता भेगडे, कार्याध्यक्ष सतीश गरुड, सदाशिव भोसले, सागर सिद्धाणकर, सागर जाधव, अमोल पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा गव्हाणे तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार बाळा भेगडे म्हणाले, “2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत तळेगाव दाभाडे शहरातून 35 बूथवरून 8 हजार 500 मतांची आघाडी महायुतीला मिळाली होती. यावेळी शहरातील मतदारांची संख्या 50 हजार 69 झाली आहे. प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शहरातून यावेळी 10 हजार मतांची आघाडी मिळवून देणार आहे. यावेळी बूथ सांभाळण्यासाठी महिला पुढाकार घेणार आहेत. महिला सशक्तीकरणाचा हा तालुक्यातील आदर्श पायंडा तळेगाव शहर निर्माण करत आहे. प्रत्येक नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या चेह-यावर विजयाचा आनंद दिसत आहे.

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सभा होणार होती. सभेची तयारी देखील सुरु केली. मात्र त्यांना हरण्याची खात्री असल्याने त्यांनी सभा रद्द केली. आता त्याच ठिकाणी महायुतीची सभा होणार आहे, असे आमदार भेगडे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, “महायुतीच्या विजयाचा आनंद सर्व तळेगावकरांच्या चेह-यावर दिसत आहे. आता ही निवडणूक मतदार राजाने हातात घेतली आहे. महायुतीच्या उमेदवाराला निवडून देऊन केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार आणायचा पण प्रत्येकाने घेतला आहे. त्यात मावळ हा महायुतीचा अभेद्य बालेकिल्ला आहे. बारामतीचा असो किंवा कुठलाही उमेदवार असो, त्याचा मावळचा मावळा निभाव लागू देणार नाही. महायुतीचा विजय निश्चित आहे.”

‘मावळचा निर्धार पुन्हा एकदा तोच खासदार’, ‘मतदान हा अधिकार नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदान करायचंय’, ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘खिंच कर तान धनुष्यबाण’ असा संदेश देणारी आकर्षक रांगोळी राजश्री भागवत यांनी काढली. पदयात्रेची सुरुवात मारुती मंदिर चौकातून झाली. पुढे ही मिरवणूक तळेगावच्या मुख्य चौकातून, जिजामाता चौक, भेगडे आळी, शाळा चौक, कुंभारवाडा, तेली आळी या मार्गावरून काढण्यात आली. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचे आकर्षक रांगोळी, फटाके, पुष्पवृष्टी आणि ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.

दरम्यान खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यास भेट दिली त्यावेळी त्यांनी सर्व वधू-वरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या चांगल्या समाजाच्या निर्माणासाठी मतदान करण्याचा सल्लादेखील बारणे यांनी यावेळी दिला या विवाह सोहळ्यात तब्बल 138 जोडपी विवाहबद्ध झाली. या विवाह सोहळ्याचे संयोजन रवींद्र भेगडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.