Talegaon Dabhade: संशयित कोरोना रुग्ण आढळल्याने तळेगाव स्टेशनचा काही भाग ‘सील’

एमपीसी न्यूज – पुण्यात एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या एका 34 वर्षीय महिलेचा खासगी प्रयोगशाळेत केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्या महिलेला पुण्यात शासकीय रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. शासकीय प्रयोगशाळेत त्या महिलेची पुन्हा चाचणी करण्यात येणार असून त्या अहवालाची नगरपरिषद प्रशासनाला प्रतीक्षा आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून ती नर्स राहात असलेला भाग सील करण्यात आला असून त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे व त्यांच्या विलगीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

मावळचे आमदार सुनील शेळके व तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. तळेगावातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून न जाता प्रशासनाकडून मिळणाऱ्या पुढील सूचनांचे पालन करून सहकार्य करावे तसेच सतर्क राहून स्वतःची आपल्या परिवारातील सदस्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय संबंधित महिला कोरोना पॉझिटीव्ह आहे, असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तळेगाव स्टेशन भागात एक कोरोना पॉझिटीव्ह महिला आढळल्याचा मेसेज सोशल मीडियावर सकाळी व्हायरल झाला. आतापर्यंत नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस खाते व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या सामूहिक प्रयत्नांमधून तळेगाव शहर कोरोनामुक्त ठेवण्यात यश आले होते. त्यात या बातमीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरल्या. त्यासंदर्भात तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळू शकला नाही. कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्यामुळे शहरातील संभ्रमाचे वातावरण अधिकच वाढले.

दुपारी आमदार सुनील शेळके यांनी यासंदर्भात प्रथम माहिती दिली. आजपर्यंत मावळ तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता परंतु आज सकाळी पुणे येथे नर्स म्हणून काम करणाऱ्या कोरोनायोद्धा  भगिनीची खाजगी रुग्णालयातील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना पुणे येथे सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, त्याठिकाणी त्यांची पुन्हा चाचणी होणार असून त्यानंतरच अधिकृत धरण्यात येईल असे शेळके यांनी सांगितले. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची माहिती घेऊन त्यांचे चाचणी करून विलगीकरण करण्याचे काम करण्याचे काम सुरू आहे , तरी तळेगाव शहरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे , कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन आमदारांनी केले आहे.

या बाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली असून कोरोना योद्धा म्हणून काम करणारे अनेकजण पुणे, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी जात आहेत त्यांची त्या-त्या ठिकाणी तात्पुरती राहण्याची सोय प्रशासनाने पुण्यातच करावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली आहे तसेच प्रशासनाने तसे केले नाही तर या लोकांसाठी वेगळ्या ठिकाणी  राहण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही शेळके यांनी सांगितले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.