Talegaon Dabhade : ‘एमपीसी न्यूज’चा जुना लोगो आणि नावाचा वापर करून फेक न्यूज व्हायरल केल्याबाबत गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजच्या जुन्या लोगोचा तसेच नावाचा गैरवापर करून अज्ञातांनी कोरोना बाबत चुकीच्या बातमीचा फोटो सोशल माध्यमांवर प्रसारित केल्याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 20) दुपारी हा प्रकार उघडकीस आला असून एमपीसी न्यूज कडून तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांवर भारतीय दंड विधान कलम 188, 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी दुपारी तळेगाव परिसरात व्हाटस अप या समाज माध्यमावर एमपीसी न्यूजचा जुना लोगो वापरून एक इंग्रजी भाषेत कोरोना बाबत चुकीची माहिती असल्याचा फोटो प्रसारित करण्यात आला होता. तसेच त्यामध्ये एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार यांच्या नावाचा देखील वापर करण्यात आला होता. एमपीसी न्यूजच्या नावाने कोरोना बाबत चुकीची माहिती पसरवून समाजात घबराटीचे वातावरण निर्माण करण्याचा निंदनीय प्रकार अज्ञातांनी केला आहे.
तसेच प्रसारित करण्यात आलेल्या फोटो पोस्टमध्ये तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांचे तसेच तळेगाव नगरपरिषदेतील दोन नगरसेवकांची देखील नावे देण्यात आली होती. मुख्याधिकारी झिंजाड यांनी संपादक विवेक इनामदार यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एमपीसी न्यूजने याबाबत शाहनिशा केली असता असा प्रकार एमपीसी न्यूजकडून झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एमपीसी न्यूजकडून ही अफवा असून बातमी ‘फेक’ असल्याचा खुलासा करणारी एक बातमी देखील प्रकाशित करण्यात आली.
एमपीसी न्यूज हे मराठी भाषेतील न्यूज पोर्टल आहे. एमपीसी न्यूजकडून बातमीची अधिकृत लिंक प्रसारित केली जाते. कोणत्याही प्रकारचा फोटो प्रसारित केला जात नाही. अज्ञातांनी एमपीसी न्यूजचा लोगो वापरून एमपीसी न्यूजची बदनामी केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सायबर सेलकडेही तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक के. एस. गवारी पुढील तपास करीत आहेत.