Talegaon Dabhade : जमीन परस्पर विकल्याप्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सातबाऱ्यावरील नाव कमी न झाल्याचा गैरफायदा घेऊन खोटे दस्तऐवज बनवून जमीन परस्पर विकल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अतिश मोहन भालसिंग (वय ३०, रा गहुंजे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरीश शांतीलाल सोळंकी, वीणा हरीश सोळंकी, कुणाल हरीश सोळंकी, अशोक शांतीलाल सोळंकी, दीपा अशोक सोळंकी, आदेश अशोक सोळंकी, कल्पना शांतीलाल सोळंकी, संतोष ज्ञानेश्वर गायकवाड, संजय ज्ञानदेव जगताप, नीता शांतीलाल सोळंकी (सर्व रा. तळेगाव दाभाडे) आणि प्रसाद शंकर शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • भालसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गहुंजे येथील गट क्र. १४५ मधील मिळकतीमध्ये तीन प्लॉट फिर्यादी यांनी खरेदी केले असून वहिवाटीस आहेत. आरोपींनी संगनमत करून याची बेकायदेशीर वारसनोंद करून घेतली. या नोंदीच्या आधारे आरोपी फिर्यादीच्या मालकीच्या मिळकती तसेच फिर्यादीने विकलेल्या प्लॉटची पुन्हा परस्पर विक्री करीत आहेत.

मिळकती घेणाऱ्या व्यक्ती जागेचा ताबा जबरदस्तीने घेत आहेत. आरोपींच्या पूर्वजांनी मिळकत विकलेली आहे, हे आरोपींना माहीत असूनही केवळ सातबाऱ्यावरील नाव कमी न झाल्याचा गैरफायदा घेऊन विकलेल्या मिळकतीची पुनर्विक्री करीत आहेत. हा प्रकार लक्षात आला असता फिर्यादी यांनी कोर्टात केलेल्या पाठपुराव्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.