Talegaon Dabhade: खून करून स्वतःच खोटी फिर्याद देणाऱ्यासह चौघे मृतदेह शववाहिकेतून नेताना गजाआड!

एमपीसी न्यूज – स्वत:च खून करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची खोटी फिर्याद देणाऱ्यासह चौघांना तो मृतदेह शववाहिकेतून नेत असताना पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने अटक केली. पोलिसांनी 24 तासांच्या आत या गुन्ह्याचा तपास लावून आरोपींचा बनाव उघडकीस आणला. आरोपींना उद्या (रविवारी) सकाळी 10 वाजता वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीसह तिघांनी लोखंडी रॉड आणि टिकावाने डोक्यात, छातीत व हातापायावर वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास तळेगाव येथील निलाया सोसायटी लेबर कॅम्पजवळील मोकळ्या जागेत घडली. याप्रकरणी फिर्यादीच आरोपी निघाला असून तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला 24 तासांतच अटक केली.

किस्मतकुमार रवीलाल शर्मा (वय 19, सध्या रा. निलाया सोसायटी लेबर कॅम्प, तळेगाव दाभाडे ता.मावळ. मूळ जि. कठीहार राज्य बिहार) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

मंगल श्रीमोहन शर्मा (वय 36), करण रमेश शर्मा (वय 22), बाबुलाल मंगल बेसरा (वय 36) व धर्मेंद्र महेंद्र शर्मा (वय 24) चौघे सध्या रा. निलाया सोसायटी लेबर कॉम्प, तळेगाव दाभाडे ता.मावळ मूळ काठीहार बिहार) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती मंगल शर्मा याच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने मयत किस्मतकुमार शर्मा याच्या पाळतीवर वरील चार आरोपी होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मयत किस्मतकुमार शर्मा उठल्याने त्याला मोकळ्या जागेत नेऊन आरोपी पतीसह तिघांनी लोखंडी रॉड व टिकावाने डोक्यात, छातीत व हातापायावर वार करून खून केला.

यातील आरोपी करण रमेश शर्मा याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून केल्याची फिर्याद शुक्रवारी दुपारी 12.20 वाजता दिली. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. मृतदेह घेऊन रुग्णवाहिका चालक मिलिंद नवाडे कठीहार बिहार निघाले होते. यातील आरोपी काहीच झाले नसल्याचा आव आणत मृतदेह गावी घेऊन निघाले होते. रुग्णवाहिका चालक मिलिंद नवाडे याला संपर्क करून गाडी थांबविण्याचे सांगितले. पोलिसांनी पाठलाग करून खुनातील आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली.

गुन्हे शाखा 5 च्या पथकाने पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, ज्ञानेश्वर बाजगिरे, कर्मचारी हर्षल कदम, बंडू तात्या मारणे, दत्ता बनसोडे, मनोज गुरव, अमोल गोरे, फारूक मुल्ला, आकाश भालेराव, विकास तारू, सतीश मिसाळ, गणेश अंबावणे आदींनी घटनास्थळी पंचनामा करुन फिर्यादी करण शर्मा याची चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांचा खाक्या दाखविताच फिर्यादीने गुन्ह्याची कबुली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.