Talegaon Dabhade : सर्वसाधारण सभेवरून नगराध्यक्षांवर ओढवली नामुष्की

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी येत्या गुरुवारी (दि. 9 ) बोलावलेल्या सर्वसाधारण सभेसाठी मुख्याधिकारी अनुपस्थित राहणार असल्याने भाजपाच्या कोअर कमिटीने ती सभा रद्द करण्याचा निर्णय काल, मंगळवारी (दि. 7 )घेतला. पक्ष कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील यांनी सांगितले. नगराध्यक्षांच्या सभेच्या निर्णयाची गंभीर दखल घेत कोअर कमिटीने त्याबाबत प्रतिकुलता दर्शविली आहे.

या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य व पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत नगरपरिषदेचे सभागृहनेते सुशील सैंदाणे यांनी सभागृह नेतेपदाचा दिलेला राजीनामाही मंजूर करण्यात आला.

नगरपरिषद अधिनियमातील तरतुदीनुसार निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेता येते, असा दावा करून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी विषयपत्रिकेतील विषय निवडतना घेतली असल्याचे आठवड्यापूर्वीच सांगितले होते. आचारसंहिता काळात अशी सभा घेता येणार नाही, असा कुठेही नियम केलेला नाही. असे ठोकपणे सांगणाऱ्या नगराध्यक्षावर अखेर ती रद्द करण्याची नामुष्की आली आहे. सर्वसाधारण सभेमुळे आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही. मात्र पक्षाच्या कोअर कमिटीच्या निर्णयामुळे त्यांच्यावर तोंडघशी पडल्याची वेळ आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर 30 एप्रिल रोजी नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभेची लेखी नोटीस नगरसदस्यांना जारी केली होती. मात्र आता ही सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे. सदर सर्वसाधारण सभेबाबत सभेच्या नोटीशीत उल्लेख केलेल्या विषय क्रमांक एक मधील २ मार्च २०१९ रोजीच्या सभेचा कार्यवृत्तान्त वाचून कायम करणे, हे आचारसंहितेचा भंग करणारे ठरू शकते. आचारसंहितेच्या काळात अशी सभा घेता येत नसल्याची त्यांची धारणा असल्याने मुख्याधिकारी वैभव आवारे या सभेस उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी पत्रव्यवहारही केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाशी केलेल्या पत्रव्यवहारावर ते ठाम राहिले. याची दखल भाजपा कोअर कमिटीला घ्यावी लागल्यामुळे नियोजित सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सर्वसाधारण सभेस उपस्थित न राहण्याबाबत दिलेल्या पत्राची दखल घेत ही सर्वसाधारण सभा रद्द करण्यात येत आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.