Talegaon Dabhade : रोटरी क्लब तळेगाव सिटीतर्फे समुपदेशन सत्रात मुलींनी जाणून घेतली ‘गुड टच व बॅड टच’ याविषयी माहिती

एमपीसी न्यूज- श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जंयती व बालिकादिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब तळेगाव सिटीच्या विद्यमाने ‘गुड टच व बॅड टच’ याविषयी माहिती देणारे समुपदेशन सत्र घेण्यात आले.

यावेळी डी.वाय पाटील कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या मानसशास्त्र प्राध्यापिका डॉ.नंदिनी देसाई व प्रा.मीनल, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष मनोज ढमाले व माजी अध्यक्ष दादासाहेब उ-हे उपस्थित होते.

अत्यंत विशवासपूर्ण वातावरण निर्मिती करीत चिमुकल्यांना वाईट लोकांपासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे याविषयी डॉ. नंदिनी व प्रा.मीनल यांनी मार्गदर्शन केले. खेळणी व गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधत विदयार्थ्यांना लाड करणाऱ्या ,खाऊ देणाऱ्या व्यक्‍ती द्वारेहीे अशी फसवणूक व शारीरीक शोषण होऊ शकते हे समजावले गेले. अशाप्रसंगी विरोध कसा दर्शवायचा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

विदयार्थ्यांच्या बदललेल्या हालचाली व गुणधर्मावरून त्यांचे भावविश्व कसे जाणून घ्यायचे व शालेय स्तरावरील तक्रार निवारण समिती यांचे महत्व याविषयी शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे ,सचिव मिलिंद शेलार यांनी कौतुक केले.

सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहा शेलार यांनी केले .आभार मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.