Rathani News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रहाटणी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आज (शनिवारी) झाले. या पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली असून हा पुतळा शहराचे वैशिष्ट्य आहे असे आपल्याला आता सांगता येईल, असेही ते म्हणाले.

महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे,  नगरसेवक शत्रुघ्न काटे, बाबा त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, नगरसेविका शीतल काटे, सुनीता तापकीर, सविता खुळे, मोरेश्वर शेडगे, भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाने, रविकांत घोडके, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते दरेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला मिळाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांचा मी आभारी आहे. या पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. हा पुतळा शहराचे वैशिष्ट्य आहे असे आपल्याला आता सांगता येईल. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपासून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एक वीटही रचली नाही.
भाजपने पाच वर्षात शहराच्या विकासाचे पुढील 30 वर्षांचे नियोजन केले आहे. वेस्ट टू एनर्जी, पंतप्रधान आवास योजना, चार हॉस्पिटल सुरू केले आहेत. चार राज्यात भाजपची सत्ता आली. जनता भाजपसोबत आहे.

राज्य सरकार पोलिसांचा वापर करून भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. भ्रष्टाचार उघड केला म्हणून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिली. पण, नोटीसीला आम्ही भीक घालणार नाही, असेही दरेकर म्हणाले.

असा आहे पुतळा!

पंचधातूमधील हा अश्वारुढ पुतळा  आहे. पुतळ्याची जिरेटोपपर्यंतची उंची 21 फूट आहे. तलवारीच्या टोकापर्यंतची उंची 28 फूट इतकी आहे. या पुतळ्याचे वजन 6 टन असून फक्त घोड्याच्या मागील दोन पायावर उभा असणारा हा वैशिष्ट्यपूर्ण असा हा पुतळा आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस उंच दगडी बांधकाम असणारी कमानभिंत आहे. या कामासाठी 2 कोटी 20 लाख 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. तसेच पुतळ्याशेजारी असलेल्या जागेत शिवाजी महाराजांच्या  जीवनातील ऐतिहासाहिक प्रसंगाचे  म्यूरल बसविण्याचे नियोजन केलेले आहे. याशिवाय सुमारे 12 मीटर इतक्या उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.