Talegaon Dabhade : कलापिनीमध्ये ‘गुरुपौर्णिमा’ साजरी

एमपीसी न्यूज- दरवर्षीप्रमाणे कलापिनी तर्फे कै. पुष्पलता अरोरा यांच्या स्मृतीला वंदन करून ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करण्यात आली. यावेळी कुमारभवनचा तिसरा वर्धापन दिन पण साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी पर्यावरण प्रेमी आणि फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक अध्यक्ष महेश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यकारिणीतील अशोक बकरे, हेमंत झेंडे, शिरीष जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुमारभवनच्या मुलांनी अक्षय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवंदनाच्या गाण्याने केली.

यावेळी मुलांनी प्रसंगनाट्य सादर केले. तसेच संस्कृत संभाषणाने मुलींनी आपले वेगळेपण दाखवले. कलापिनीच्या उपाध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात मुलांचे कौतुक केले आणि पालकांना आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बालभवन, कुमारभवन या उपक्रमांमध्ये पाठवावे असे सांगितले.

दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यासाठी विनोद मेहता हे उपयुक्त भेटवस्तू देत असतात. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते 10 वी, 12 वी, पदवीधर विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांपैकी सायली रौंधल आणि शार्दूल गद्रे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अभ्यासाबरोबरच आपली आवड जपत परीक्षेत यश संपादन करत येते हे दोघांनी नमूद केले.

प्रमुख पाहुणे महेश महाजन यांनी आपल्या मनोगतात मुलांनी आपली आवड जोपासावी, छंद जोपासावा आणि आपले भविष्य घडवावे असे सांगितले. कलापिनी संस्थेमध्ये तुम्हाला कले बरोबरच माणूस म्हणूनही समृद्ध होऊ शकता असे सांगितले. कलापिनीचे कार्यकारिणी सदस्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणतज्ञ् डॉ आनंद वाडदेकर यांनी मुलांबरोबरच पालकांनी ही मुलांची आवड आणि निवड योग्य ठरवावी आणि त्यांच्या योग्यतेप्रमाणे करिअर निवडू द्यावे असे सांगितले.

कलापिनीचे विश्वस्थ डॉ अनंत परांजपे यांनी कै पुष्पलता अरोरा यांच्या विषयीच्या आठवणी सांगितल्या आणि बालभवन हे त्यांच्या मुळेच आज इतक्या चांगल्या प्रकारे चालू आहे असे सांगितले. तसेच कलापिनीच्या विविध स्पर्धांची माहिती देत मुलांबरोबर पालकांनीही ह्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपली कला जोपासावी असे सांगितले. कुमारभवन या संकल्पनेचा मुलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच आता आपण नाट्य विषयाचा अभ्यासक्रम ही सुरु केला असून त्याच्या परीक्षा सुद्धा घेणार आहोत असे त्यांनी जाहीर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गोखले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनघा बुरसे, आरती पोलावार, वृषाली आपटे, मीरा कोन्नूर, पांढरे काकू आदित्य धामणकर, विशाखा बेके, प्रतीक मेहता आणि सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. कलापिनीच्या श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.