Talegaon Dabhade: कोणतीही सूचना न देता शुक्रवारपासून एचडीएफसी बँकेची शाखा बंद, ग्राहकांची गैरसोय 

Talegaon Dabhade: HDFC Bank branch closed from Friday without any notice, inconvenience to customers

एमपीसी न्यूज – कोणतीही सूचना तसेच कारण न देता एचडीएफसी बँकेची तळेगाव शाखा शुक्रवारपासून बंद असल्याने शहरातील बँकेच्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. बँकेच्या सकाळी 10 ते दुपारी दोन या सध्याच्या कार्यालयीन वेळेत गेल्यानंतर बँक बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. बँक का बंद आहे, किती दिवस बंद आहे, याबाबत कोणतीही सूचना बाहेर लावण्यात आलेली नसल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बँकेच्या सुरक्षा रक्षकाकडे विचारणा केली असता त्यालाही बँक बंद असण्यामागील कारण माहीत नसल्याचे तो सांगत आहे. बँकेच्या कस्टमर केअर नंबरशी संपर्क साधला असता, त्यांनाही नेमके कारण सांगता आले नाही. बँकेच्या कस्टमर रिलेशन मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता ही सेवा सध्या उपलब्ध नसल्याची सांगण्यात येत आहे.

बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचा संपर्क क्रमांक मिळवून विचारले असता, तळेगावमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने जाहीर करण्यात आलेल्या कन्टेनमेंट झोनमध्ये बँकेची शाखा येत असल्यामुळे तहसीलदारांच्या आदेशानुसार बँकेची शाखा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गावातील अन्य सर्व बँका सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर या संदर्भात बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी सारवासारव त्यांनी केली.

यासंदर्भात मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याशी संपर्क साधला, कन्टेनमेंट झोनबाबत काढलेल्या आदेशात बँक बंद ठेवण्याबाबत कोणताही उल्लेख नाही. बँका या अत्यावश्यक सेवांमध्ये येतात, उलट लॉकडाऊनच्या काळात लोकांना आर्थिक चणचण भासू नये म्हणून बँका सुरू ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर कन्टेनमेंट झोनच्या आदेशाचा संदर्भ देऊन एखादी बँक बंद ठेवली जात असेल तर ती गंभीर गोष्ट असून त्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल तसेच संबंधित बँकेकडे त्याबाबत विचारणा करण्यात येईल, असे ते बर्गे यांनी सांगितले. 

बँक कामकाजाच्या नवीन वेळेव्यतिरिक्त कोणतीही सूचना बँकेच्या बाहेर लावली नसल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.