Talegaon Dabhade: मावळ तालुक्यात दिवसभर मुसळधार पावसाचे थैमान

Talegaon Dabhade: Heavy rains lashed Maval taluka throughout the day effect of nisarga cyclone

तळेगाव दाभाडे – अरबी समुद्रात उद्भवलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने बुधवारी दिवसभर थैमान मांडले होते. जोरदार वारे आणि पावसामुळे अनेक नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले होते.

मंगळवारपासून ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी पावसाने वादळ वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली होती. निसर्ग चक्रीवादळाने मावळ पट्ट्यात बुधवार सकाळपासून पावसाची सुरुवात झाली होती.

वारेही जोरदार वाहत होते. सायंकाळनंतर पावसाचा जोरही वाढला होता. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते.

बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने रस्ते ओस पडले होते. तर बाजारपेठेत शुकशुकाट निर्माण झाला होता.

संपूर्ण मावळ तालुक्यावर या वादळाचा प्रभाव पडल्यामुळे काही ठिकाणी जुने वृक्ष उन्मळून पडले होते. तर विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता.

तालुक्याच्या काही भागातील तसेच तळेगावाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली.

तर जोरदार वाऱ्यामुळे आंबा, जांभूळ या फळझाडांचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले होते. तर पूर्ण पट्ट्यातील काही पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगण्यात आले.

अरबी समुद्रावर निसर्ग चक्रीवादळाचा जोर वाढल्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तळेगाव परिसरामध्ये वादळ, वारा, वीज तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांपासून सावधानतेचा इशारा देण्यात येत होता.

बुधवार सकाळपासूनच तळेगाव दाभाडे परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. जोरात वादळ चालू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसाट्याच्या वादळाने अनेक झाडे पडली आहेत.

वतननगर, राव कॉलनी, कातवी रोड, यशवंत नगर, समता कॉलनी, हॉस्पीटल कॉलनी वीज कर्मचारी वसाहत अशा अनेक ठिकाणी झाडे पडली असून अनेक झाडे विद्युत वाहिन्यांवर आणि वाहनांवर पडली.

यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तळेगाव परिसरातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडीत आहे. वीज महावितरणचे आणि वीज महापारेषणचे कामगार आणि अधिकारी वीज पुरवठा सुरळीत करणेसाठी जिवाची पराकष्ठा करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.