Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालय इतिहास विभागाच्या हेरिटेज वॉकला प्रचंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज- इंद्रायणी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने आयोजित केलेल्या हेरिटेज वॉकला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तळेगाव दाभाडे मधील ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास जाणून घेतला.

या हेरिटेज वॉकमध्ये सतीची समाधी, वीरगळ, राजघराण्याची समाधीस्थाने, घुमटाची विहीर, बामणडोह, शिलालेख, श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे व श्रीमंत सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांच्या समाधी, बनेश्वर मंदिर, डोळसनाथ मंदिर, पाचपांडव मंदिर या ऐतिहासिक स्थळांची पाहणी व इतिहासाचा अभ्यास करण्यात आला.

प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी इतिहास उलगडून दाखवताना सांगितले की, “अनेक बलाढ्य दुर्गांवर हेरिटेज वॉक आयोजित केले जातात मात्र त्याआधी आपण ज्या गावात राहतो तेथील स्थानिक इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. तळेगाव दाभाडेला महान इतिहास लाभला असून त्या इतिहासाची स्थळे पाहणे व घडलेला इतिहास बारकाईने समजून घेणे हे आजच्या तरुणाईसाठी भविष्याची उत्तम वाटचाल ठरेल. तळेगाव दाभाडे मधील प्रत्येक नागरिकाने व विद्यार्थ्याने दाभाडे सरकारांचा इतिहास समजावून घेऊन स्वतःला घडविले पाहिजे. नवी पिढी राष्ट्रनिष्ठ घडण्यासाठी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचा इतिहास मार्गदर्शक आहे”

इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी हेरिटेज वॉकच्या सुरुवातीला प्रास्ताविक केले. राज्यशास्त्र विभागाचे प्रा. मिलिंद खांदवे व प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. रोहित नागलगाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निलेश गराडे यांनी सर्प विषयक महत्वपूर्ण माहिती दिली. सदर हेरिटेज वॉकचा समारोप राजवाड्यात करण्यात आला. याप्रसंगी श्रीमंत सरदार सत्येंद्रराजे व श्रीमंत याज्ञसेनीराजे दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अल्पोपाहाराची व्यवस्था केली. इंद्रायणी विद्यामंदिरचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे व खजिनदार चंद्रकांत शेटे यांनी “असे हेरिटेज वॉक वारंवार होणे आवश्यक आहे यातून विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक ज्ञान वाढते व आपल्या जाज्वल्य इतिहासाच्या प्रति ते जागरूक राहतात” असे मत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.