Talegaon Dabhade : परिसरातील दोनशे गरजू नागरिकांना घरपोच जेवण

तळेगाव दाभाडे – येथील मरीमाता मंडळ, तरुण ऐक्य मित्र मंडळ व संतोषभाऊ भेगडे स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने रोज दोनशे गरजू व्यक्तींना जेवणाचे पॅकेट घरपोच देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. आज रविवार (दि 29) पासूनच हा सेवाभावी उपक्रम सुरु करण्यात आला.

या तीनही संस्थांच्या वतीने तळेगाव परिसरातील गोरगरीब गरजू व्यक्तींना अन्न पोहचविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदीमुळे अनेक छोट्या कंपन्यामधील कामगार, मजुर व नेहमी मोलमजुरी करून हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची सर्वात जास्त बिकट अवस्था झाली आहे. अशा लोकांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी सकाळी बाहेर पडावे लागते. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे
देशात सर्व ठिकाणी लॉकडाऊन चालू असल्याने सगळे काम आणि व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यामुळे अशा गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

तसेच संचारबंदीमुळे मावळातील अनेक छोट्या कंपन्यामधील कामगार, मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून मरिमाता मंडळ, तरूण ऐक्य मित्र मंडळ व संतोषभाऊ भेगडे स्पोर्टस् फाऊंडेशन आदींकडून गावभागातील गोरगरीब, मोलमजुरी करणा-या रोज दोनशे बांधवांना एकवेळी घरपोच जेवणाची पॅकेट देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते आणि डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे या अन्नदानात पालन केले जात आहे. स्वयंसेवक स्वतः मास्क, हॅन्डग्लोजचा वापर करत आहेत. तसेच एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून गरीब, गरजू लोकांच्या वस्तीवर जाऊन कार्यकर्ते जेवणाची पॅकेट वाटप करीत आहेत.

या अन्नछत्रात दररोज दोनशे लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच अन्नदान करण्याबरोबर कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे काम मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत. या उपक्रमामुळे या गरिब मजुरांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

या उपक्रमासाठी ज्या दानशुर व्यक्तीना वस्तू रूपाने गहू, तांदूळ, तेल, आटा, भाजीपाला व इतर साहित्य देऊन हातभार लावायचा असेल त्यांनी संतोष भेगडे -9922901818, सोमनाथ भेगडे-9921291243, अक्षय रानवडे-8087444214, बाळासाहेब वाजे- 9822549400, धनराज माने- 7507757577,
सिध्दार्थ भेगडे- 9860285747 यांच्याशी संपर्क करून वस्तू रूपाने मदत करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.