Talegaon Dabhade: कोरोना आपत्ती व्यवस्थापनावरून सभागृह नेत्यांचे नगर परिषद प्रशासनावर टीकास्त्र

Talegaon Dabhade: House leader Amol Shete criticize municipal council administration over corona disaster management

एमपीसी न्यूज – संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढत असताना सर्व तळेगावकर नागरिकांना मात्र कोरोना आणि विशेषतः ताळतंत्र नसलेले प्रशासन अशा दोन गोष्टींचा सामना करावा लागत आहे, असे टीकास्त्र तळेगाव नगरपरिषदेतील सभागृह नेते अमोल शेटे यांनी सोडले आहे. ही कोरोना विरोधी लढाई राजकारण विरहित व एकत्रित लढण्याची आहे. कुणा एकाच्या व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी काम केले तर त्याचे वाईट परिणाम संपूर्ण गावाला भोगायला लागतील आणि आपण हा धोका कदापि पत्करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तळेगावातील कोरोना आपत्ती व्यवस्थापनाबाबत सभागृह नेते शेटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना टास्क फोर्स म्हणून तळेगावातल्या विश्व हिंदू परिषद – बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे सुरुवातीपासून अतिशय सुंदररित्या मानवतेच्या नात्याने ह्या परिस्थितीवर उपाय योजना करायला सुरुवात केली आणि आजही करीतच आहेत, असे शेटे यांनी म्हटले आहे.

सर्वात आधी सांगोपांग चर्चेतून परिसरातील सर्वच्या सर्व डॉक्टर हे त्यांच्या त्यांच्या कामांवर रुजू व्हावेत ह्याची विनंती करण्यात आली. त्याला सर्व डॉक्टरांनी पूर्ण सहमती दर्शविली. तालुका आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले तर त्यांना पणनमंडळाची जागा उपचाराकरिता, राहण्यासाठी योग्य असेल म्हणून ती मिळवण्यात आली. पुढील काही उपक्रमांची राज्य आणि देशानेही दखल घेतली. भाजीपाला विक्रीत सुसूत्रता, अतिशय योग्य अंतर ठेवून सर्व नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यात ह्या दोन सामाजिक संस्थांचं फार मोठे योगदान सुरू होते, याकडे शेटे यांनी लक्ष वेधले आहे.
नगरपालिका प्रशासन गावातल्या कोणत्याही गरीब व गरजू कुटुंबाना कोणत्याही प्रकारची मदत पोहोचवण्याच्या मनस्थितीत नव्हती. यावर उपाय म्हणून ह्या संस्थानी स्वखर्चातून संपूर्ण तळेगांवातल्या गरजू आणि गरीब कुटुंबापर्यंत अन्न धान्य पोहोचवले आणि हे कार्य अविरत सुरू आहे, असे शेटे यांनी म्हटले आहे.

तळेगाव नागरपरिषदेत काही दानशूर व्यक्तींनी धान्य आणि पैसे मदत स्वरूपात जमा केली. पण नगरपालिका प्रशासनाने या वस्तूंचे आणि निधीचे वाटप कुठे केले याचा पत्ता कोणत्याही लोकप्रतिनिधीला नाही. या अन्नधान्य व आवश्यक साधनसमग्रीतील अपहार नागरिकांच्या व लोक प्रतिनिधींच्या लक्षात आल्याचे बघून नगरपालिका प्रशासनाने पुढील सहकार्य करण्यास टाळाटाळ करायला सुरुवात करून एकूणच संपूर्ण शिस्तीत सुरू असलेल्या कामांना वेगळं रूप प्राप्त व्हायला लागले, असा गंभीर आरोप शेटे यांनी केला आहे.

मूळात तळेगाव दाभाडे नागरी प्रशासनाला सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील आरोग्य सेवकांची माहिती कळविली होती. पण निदान त्यांच्या राहण्याची किंवा इतर काही आवश्यक गोष्टींची पूर्तता प्रशासनाने करणे बंधनकारक होते. आता आपल्या गावातील एका आदरणीय आरोग्य सेविकेला कर्तव्य पार पडताना कोरोनाची लागण झाली आहे , त्यात त्यांचा दोष नाही. त्या सेवाच करत होत्या. पण या खऱ्या सेवाभाविंची सेवा ज्यांनी करायला हवी असे स्थानिक प्रशासन दुर्दैवाने ढिम्म बसून होते, अशी टीका शेटे यांनी केली आहे.
तळेगांवमध्ये रुग्ण आढळल्यानंतर आणि त्या आधी काही दिवस प्रशासनाचे ताळतंत्र बिघडले आहे, हे जाणवत होतेच. सातत्याने होणारे शंभर टक्के बंद आणि त्यात मिनिटा-मिनिटाला बदलणाऱ्या वेळा यावरून प्रशासन कोणाच्या तालावर नाचत आहे, हेच सामान्यांच्या लक्षात येत नाही, असा शेराही शेटे यांनी मारला आहे.

कोणतीही माहिती किंवा पूर्वसूचना न देता कोणतेही निर्णय घेऊन तळेगावातल्या नागरिकांची तारांबळ उडवण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.
आता रुग्ण सापडल्यानंतर तातडीने सामाजिक संस्थांच्या मदतीने त्या इमारतीतील लोकांना सुरक्षित ठिकाणी विलगिकरण कक्षात हलविण्यात आले. पण त्यांना चार ते पाच तास पाणीही मिळाले नसल्याची तक्रारही आली आहे. आज वीस लोकांना सांभाळण्यात प्रशासन असमर्थ दिसत आहे.पुढील परिस्थितीचा विचारही करवत नाही, असे शेटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

नगर प्रशासनाने स्थानिक नगरसेवक व  सामाजिक संस्था ह्यांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेतले तरच कदाचित पुन्हा तळेगावातील वातावरण पूर्ववत होऊ शकेल, असे मत शेटे यांनी शेवटी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.