Talegaon Dabhade : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक

तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – बेकायदा, विनापरवाना गावठी कट्टा जवळ बाळगल्या प्रकरणी एका सराईत गुन्हेगारास तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई सुदवडी गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. १५) पहाटे दोनच्या सुमारास करण्यात आली.

प्रतीक राम डोके (वय २१ ,मूळ रा.कुमशेत ता.जुन्नर, जि. पुणे. सध्या रा.तानाजीनगर ,चिंचवड )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा, ९ एम.एम.बोअरचे पितळी धातूचे दोन राउंड, स्विफ्ट मोटार जप्त करण्यात आली. त्याच्यावर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेकायदा हत्यार बाळगणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांच्या पथकाने केली. प्रतीक डोके याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरी, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक डोके हा तळेगाव-चाकण रस्त्यावर सुदवडी गावच्या हद्दीत भंडारा डोंगराच्या पायथ्यालगत एका लाल रंगाच्या मारुती स्विफ्टकार मध्ये संशयास्पद हालचाली करताना आढळला. नंतर त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. प्रतीक डोके याला शुक्रवारी वडगाव न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.