Talegaon Dabhade: नगरपरिषदेच्या फिरत्या हौदात 2 हजार गणेश मूर्तींचे विसर्जन

दरवर्षीचा ढोलताशांचा दणदणाट आणि गुलाल भंडा-याची उधळण यंदा दिसली नाही.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसेवा विकास समितीच्या वतीने सातव्या दिवशीचे गणेश विसर्जन सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत करण्यात आले. त्याचबरोबर नगरपरिषदेच्या संकलन केंद्रात तसेच फिरत्या पंधरा हौदात सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती असे साधारणपणे अठराशे ते दोन हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

सार्वजनिक विहिरी, तळे तसेच नद्यांचे घाट आदी ठिकाणी विसर्जनावर घातलेल्या बंदीचे गणेशभक्तांनी उत्स्फूर्तपणे पालन केले. दरवर्षीचा ढोलताशांचा दणदणाट आणि गुलाल भंडा-याची उधळण यंदा दिसली नाही.

प्रशासनाने सूचना दिल्याप्रमाणे बहुतेक नागरिकांनी शाडूच्या आणि घरी बनवलेल्या गणेश मूर्तीचे घरातच कृत्रिम कुंड तयार करून विसर्जन केले.

उर्वरित नागरिकांनी नगरपरिषदेने ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रात मूर्तीदान केले. वीरचक्र मंडळासमोर मुख्याधिकारी रवींद्र पवार, पोलीस निरीक्षक वाघमोडे, जनसेवा विकास समिती संस्थापक किशोर आवारे, नगरसेवक गणेश खांडगे, गणेश काकडे, निखिल भगत, सुशील सैंदाणे, रोहित लांघे, संतोष शेळके, कल्पेश भगत, सुनील पवार आदींच्या उपस्थितीत सामुदायिक आरती होऊन सार्वजनिक गणेश विसर्जन मूर्ती संकलनाला प्रारंभ झाला.

जनसेवा विकास समितीच्या स्वयंसेवकांकडून स्टेशन परिसरातील उपनगरामधून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर, टेम्पो मिळून अठरा ते वीस वाहनाद्वारे गणेश मूर्ती संकलन करून कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात आले. सायंकाळपर्यंत अठराशे ते दोन हजार मूर्तीचे संकलन झाले.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आणि एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आला होता.

कातवी, आंबी, वराळे, इंदोरीतील इंद्रायणी नदीच्या घाटासह तळेगावातील गावतळे आणि स्टेशनच्या तळयावर पोलिसांनी अडथळे उभारून बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणीही इकडे फिरकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.