BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : करवाढीच्या मुद्द्यावरून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत रणकंदन

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- करवाढीच्या मुद्द्यावरून व मागील सभेचा वृत्तांत वाचण्यास नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना वेळेचा अपव्यय वाटल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी (दि. 10) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये रणकंदन झाले. मागील सभेचा कार्यवृत्तांत न वाचताच त्यास मंजुरी दिल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांनी संतप्त होत सभागृहात मागील सभेचा कार्यवृत्तांत भिरकावला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने आकारण्यात येणाऱ्या करवाढीचा विषयावर गुरुवारी(दि. 10) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार चर्चा झडली. करवाढी संदर्भात शासकीय पत्रव्यवहार सभागृहासमोर मांडण्याची मागणी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी गटनेते किशोर भेगडे, ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे आणि संतोष भेगडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. सभागृह नेते विजय सैंदाणे यांनी शासकीय पत्राचा हवाला देत चतुर्थ वार्षिक कर आकारणी कमी करण्याची आकडेवारी मांडली. मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी करवाढ सुनावणी अहवालात काही त्रुटी झाल्याची कबुली दिली.

करवाढ कमी झाली तर ती सरसकट होणार असून नागरिकांना करवाढीतून दिलासा देण्यासाठी सर्व नगरसेवकांची सभागृहात एकवाक्यता दिसून आली. मात्र कारवाढीमधून किती दिलासा मिळणार, कोणत्या कालावधीसाठी मिळणार व कोणकोणत्या मालमत्तेसाठी मिळणार यावरून सभागृहात प्रखर मतभेद व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, करवाढी संदर्भात काही सत्ताधारी नगरसेवक सभागृहात एक आणि बाहेर दुसरी भूमिका घेऊन नागरिकांची दिशाभूल करतात, असा आरोप किशोर भेगडे यांनी सुनील शेळके यांच्यावर केला. त्याचप्रमाणे शासकीय पत्र लपवून श्रेय घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचाही त्यांनी आरोप केला. यावेळी विजय सैंदाणे आणि संतोष भेगडे यांच्यात राजकीय निष्ठेच्या आणि सभागृहातील भूमिकांच्या मतभेदातून हमरीतुमरी झडली.

सभागृहातील गोंधळ आणि तापलेल्या वातावरणास शांत करण्यासाठी नगराध्यक्ष चित्र जगनाडे यांनी पूर्वार्धात अर्ध्या तासासाठी सभा तहकूब केली. पुन्हा सभा सुरू झाली तेंव्हा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी वेळेचा अपव्यय असल्याचे सांगत मागील सभेचा वृत्तांत न वाचताच तो विषय मंजूर केल्याचे जाहीर केले. याच्या निषेधार्थ बापूसाहेब भेगडे यांनी संतप्त होत सभागृहात मागील सभेचा कार्यवृत्तांत भिरकावला. त्यावर नगराध्यक्षानी आजच्या सभेचे पटलावर असलेले सर्व विषय वाचन न करता मंजूर झाले असल्याचे घोषित करून वंदे मातरम घेऊन सभेचे कामकाज पूर्ण केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.