Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात भरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इंद्रायणी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांनी सुवर्णमहोत्सवी स्नेहमेळावा मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला.

यावेळी 1968 ते 2017 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत महाविद्यालयीन आठवणी जागवल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे होते.यावेळी व्यासपीठावर आमदार संजय भेगडे,माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री पूजा पवार(साळुंखे), प्रा.सुभाष जगताप, शैलेश शाह, चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष चंद्रभान खळदे, उपाध्यक्ष सुनील काशीद, सचिव संतोष खांडगे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, खजिनदार दिनेश शहा, सहखजिनदार प्रज्ञा दोशी, कार्यकारिणी सदस्य सुहास गरुड,भगवान बोत्रे, राजेंद्र जांभुळकर, राजेंद्र दाभाडे, सतीश खळदे, स्वाती शिंदे, अशोक काळोखे, सुधा जोशी, दशरथ जांभुळकर, राजेश पटाडे, विलास काळोखे आदी उपस्थित होते.

मेळाव्यास जिल्ह्यातील विविध भागातून तसेच राज्य व परराज्यातूनही आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत संघटनेचे अध्यक्ष चंद्रभान खळदे यांनी केले. खळदे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी चंद्रकांत शेटे, डॉ.अपर्णा रायरीकर, सुधाकर देशमुख, भगवान गाढवे यांच्यासह 1968 सालच्या प्रथम बॅचमधील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

दरम्यान, महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त केक कापण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी संघटनेने काढलेल्या ‘स्मरण इंद्रायणीचे – शब्द कृतज्ञतेचे’ या सुवर्णमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सुरेश साखवळकर, प्रा जयंत जोर्वेकर, अतुल पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे म्हणाले, “महाविद्यालयाने गेल्या पन्नास वर्षात संस्काररुपी शिक्षण दिले आहे. त्यामुळेच या महाविद्यालयाचे विद्यार्थी आज सर्व क्षेत्रात मोठ्या पदांवर दिसतात. उद्याचे नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षणव्यवस्था करीत असते”
आमदार संजय भेगडे म्हणाले, “मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे.माझ्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनात येथील गुरुजनांचे मार्गदर्शन लाख मोलाचे आहे”

अभिनेत्री पूजा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना चित्रपट पदार्पणात आठवणी जागवत चित्रपटाबरोबरच संसारही यशस्वीपणे केल्याचे सांगितले. रामदास काकडे यांनी महाविद्यालयाच्या इतिहासाला उजाळा देत सद्यस्थिती कथन केली .सुनील शेळके यांनीही आपल्या छोटेखानी भाषणातून संपूर्ण सभागृहाला हास्यकल्लोळात लोटले.

यावेळी फिश पॉण्डच्या कार्यक्रमाने अधिक रंगत आणली. हास्याच्या फवार्‍यात विद्यार्थी तल्लीन झाले होते. फिशपॉण्डच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील काशीद आणि भगवान बोत्रे यांनी केले. शैलेश शाह, प्रा.सुभाष जगताप, चंद्रकांत शेटे, संतोष खांडगे, अशोक काळोखे, राजेंद्र जांभुळकर, सुहास गरुड, दशरथ जांभुळकर, विवेक गुरव, मुग्धा जोर्वेकर, शंकर हदीमनी, लक्ष्मण मखर, विलास भेगडे आदींनी मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात मान्यवरांनी संघटनेच्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ जांभुळकर यांनी केले. दिनेश वाडेकर यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.